Home > News Update > म्युकरमायकोसीस रुग्णांसाठी राज्यात आता स्वतंत्र वॉर्ड

म्युकरमायकोसीस रुग्णांसाठी राज्यात आता स्वतंत्र वॉर्ड

म्युकरमायकोसीस रुग्णांसाठी राज्यात आता स्वतंत्र वॉर्ड
X

Courtesy -Social media

राज्यात काळी बुरशी (म्युकरमायकोसीस) आजाराचे रुग्ण वाढत असून त्यांच्या उपचारासाठी शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड करावेत. उपचारासाठी विशेषज्ञ आणि नर्स यांचे स्वतंत्र पथक करावे अशा सूचना विभागाला दिल्याची माहिती, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

जालना येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याबाबत माहिती दिली. कोरोनाच्या काळात काळी बुरशी आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. कोरोना पाठोपाठ हे नविन आव्हान उभे ठाकले आहे. मात्र, त्याला तोंड देण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करत आहे.

या आजारावरील रुग्णांसाठी कान,नाक,घसा तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, न्युरोसर्जन, प्लास्टीक सर्जन या विशेषज्ञांची आवश्यकता भासते. प्रत्येक ठिकाणी एकाच छताखाली एवढे विशेषज्ञ उपलब्ध होतील असे नाही. त्यामुळे मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचाराची सुविधा केली जात असून महात्मा फुले जनारोग्य योजनेत सहभागी असलेल्या ठराविक मोठ्या रुग्णालयात या आजारावर उपचार केले जाऊ शकतात, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील शासकीय महाविद्यालये आणि खासगी महाविद्यालयातील रुग्णालयांमध्ये विशेषज्ञ उपलब्ध होतात त्याठिकाणी काळी बुरशीच्या रुग्णांवर उपचाराची सोय करण्यात यावी. तेथे स्वतंत्र वॉर्ड करतानाच उपचाराची स्वतंत्र पथक देखील नेमावे, अशा सुचना केल्याचे टोपे यांनी सांगितले.

या आजारावरील उपचारासाठी आवश्यक असलेले इंजेक्शन उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आज ५००० इंजेक्शन प्राप्त झाले असून त्याचे वितरण करण्यात आले असून हाफकिन महामंडळाच्या माध्यमातून १ लाख इंजेक्शन खरेदीची प्रक्रिया सुरू असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

अंगावर दुखणे काढण्याचे आणि उशीरा उपचारासाठी दाखल होण्याच्या प्रमाणामुळे राज्याचा मृत्यूदर जास्त असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. त्यासाठी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे रुग्ण गेल्यास त्यांनी लक्षण दिसताच आधी चाचणी करावी आणि त्यानंतर उपचार करावेत अशा सूचना सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना आरोग्य यंत्रणेमार्फत दिल्याचे टोपे यांनी सांगितले.

राज्यात कोरोना उपचारासाठी कोविड सेंटर्स (सीसीसी) आणि कोविड केअर रुग्णालये आहेत (डिसीसीएच) तेथे दाखल रुग्णांची आवश्यक त्या रक्त तपासणी करण्यात यावी. त्याचबरोबर सीसीसी मधील लक्षणे नसलेल्या रुग्णांची सीबीसी आणि सीआरपी या दोन रक्त तपासण्या करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Updated : 15 May 2021 9:04 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top