'देशातील तुरुंगांचेही खासगीकरण झाले काय?' ; खासदार संजय राऊत यांची भाजपवर टीका
X
मुंबई : दिवाळीनंतर महाराष्ट्रातील आणखी काही मंत्र्यांना तुरुंगात पाठवू असे भाजपचे काही वाचाळवीर दररोज म्हणतात. तसेच ईडी, सीबीआय आणि एनसीबी ज्याप्रकारे काम करीत आहेत ते पाहता देशातील तपासयंत्रणा आणि तुरुंगांचेही खासगीकरण झाले काय?, असा प्रश्न पडत असल्याचा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातील 'रोखठोक' मधून संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केले आहे.
देशात अनेक सार्वजनिक उपक्रमांचे खासगीकरण मोदी सरकारने केले. अनेक सरकारी कंपन्या आपल्या मर्जीतील उद्योगपतींना विकल्या. ''दोघेजण विकायला बसलेत व दोघेच जण खरेदी करतात,'' अशी टवाळी त्यावर सुरू आहे.असं राऊत यांनी म्हटले आहे. रेल्वेपासून ते एअर इंडियापर्यंत सगळेच खासगी झाले. त्यातच महाराष्ट्रात याला तुरुंगात टाकू व त्याला तुरुंगात टाकू, असं भाजपचे काही नेते रोज सकाळी उठून सांगतात. तेव्हा देशातील तुरुंगांचेही खासगीकरण झाले काय? असा प्रश्न पडतो. मोदी है तो मुमकीन है! असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला.
दरम्यान केंद्र सरकारने पेट्रोल 5 रुपये आणि डिझेल 10 रुपयांनी स्वस्त केले. यामुळे 'भाजप'चे लोक खूश झाले आणि पहा आपले पंतप्रधान किती मोठ्या मनाचे आहेत असे सांगू लागले. पेट्रोल डिझेलच्या शंभरी पार केल्यानंतर पाच-दहा रुपये कमी करणे हा दिलासा म्हणता येणार नाही. 13 राज्यांतील पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाल्याने हे पाच रुपये कमी करण्यात आले. महाराष्ट्रातील विरोधी पक्ष महागाईवर बोलत नाही. तर 5 रुपये कमी केल्याने बागडत आहेत, पण पेट्रोल डिझेल शंभरीच्या खाली उतरायला तयार नाही, याकडे राऊत यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.