"आपला आवाज केवळ बीड जिल्ह्यातच नाही, तर मुंबई- दिल्ली पर्यंत पोहचतो"- प्रीतम मुंडे
X
"आपला आवाज केवळ बीड जिल्ह्यातच नाही, तर मुंबई- दिल्ली पर्यंत पोहचतो. सावरगावचा दसरा मेळावा हा कुठल्या पक्षाचा मेळावा नाही. हा कोणत्या कार्यकर्त्यांचा मेळावा नाही. तर हा मेळावा भगवानबाबांच्या भक्तांचा आणि गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाचा आहे." असं खासदार प्रीतम मुंडे यांनी म्हटले आहे, बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे भगवान भक्तीगडावरील दसऱ्या मेळाव्यात प्रीतम मुंडे बोलत होत्या.
दरम्यान यावेळी प्रीतम मुंडे यांनी सावरगावच्या गावकऱ्यांचं आभार मानले. आज या मेळाव्याला येत असताना गेल्या काही दिवसांपूर्वी इतकी अतिवृष्टी झाली की काही लोकांच्या मनात शंका होती की मेळावा होईल का नाही? ज्या लोकांच्या मनात शंका होती त्या लोकांना सांगायचं आहे, जरा डोळे उघडून बघा. हा जनसमुदाय बघा. हा भगवान बाबांचा आशीर्वाद आणि मुंडे साहेबांच्या संस्कारांचा प्रतिक आहे असं प्रीतम मुंडे म्हणाल्या.
आज विजयादशमीचा दिवस आहे, नवरात्रीचा सण हा देवीचा सण म्हणून साजरा करतो. देवीचे अनेक रुप बघता येतात. देवीचं सोज्वळ, मायाळू, सहनशील रुप आपण बघतो. पंकजा ताई पालकमंत्री असताना हे मायावी, सोज्वळ आणि सहनशीलरुप आपण बघितलं. जेव्हा समाजात आराजकता पसरते, विषमता, अन्याय पसरतो तेव्हा तीच देवी दुर्गेचा अवतार घेऊन त्या अन्यायाला संपविल्याशिवाय राहत नाही , असं सूचक विधान प्रीतम मुंडे यांनी केलं
आज दसरा मेळाव्यात आलेला प्रत्येक माणूस मनामध्ये अपेक्षा घेऊन आला आहे. मुंडे परिवारासाठी हा मेळावा खूप महत्त्वाचा आहे. कारण मुंडे परिवार म्हणजे फक्त पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे नाही. तर इथे आज महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आलेला प्रत्येक जण सर्व मुंडे परिवाराचा भाग आहे. हा मेळावा प्रत्येक वंचित माणसाचा मेळावा आहे. येथे आल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा मिळते असं प्रीतम मुंडे म्हणाल्या.