खासदार मोहनभाई डेलकर यांची मुंबईत आत्महत्या
X
केंद्र शासित प्रदेश दादरा नगर हेवेलीतील खासदार मोहनभाई डेलकर यांचा मृतदेह मुंबईतील सी-ग्रीन हॉटेलमधे आढळून आला आहे. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचं म्हटलं जातं आहे. खासदार डेलकर यांचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. अपक्ष खासदार असलेले डेलकर यांचे वय 58 वर्षे इतके होते.
खासदार मोहनभाई डेलकर यांचा मृतदेह हॉटेल सी ग्रीनमध्ये आढळून आला. त्यांच्या मृतदेहाशेजारी गुजरातीमध्ये सुसाइड नोटही सापडली असल्याचं म्हटलं जात आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून मुंबई पोलिस अधिक तपास करत आहेत. त्यांनी कारखान्यात काम करणाऱ्या आदिवासी लोकांच्या हक्कासाठी लढा दिला आहे. त्यांनी 1985 मध्ये आदिवासी विकास संघटना स्थापन केली होती.
1989 मध्ये ते पहिल्यादा दादरा आणि नगर हवेली मतदारसंघातून अपक्ष म्हणून लोकसभेवर निवडून आले होते. 1991 आणि 1996 मध्ये ते काँग्रेसतर्फे पुन्हा लोकसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर 1998 मध्ये भाजपकडून ते लोकसभेत आले. 1999 मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून आणि 2004 मध्ये भारतीय नवशक्ती पार्टीतर्फे त्यांनी लोकसभेची जागा मिळवली होती.