ओबीसी आरक्षणासाठी सांगलीमध्ये मुंडण आंदोलन
X
सांगली : ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे या मागणीसाठी सांगलीमध्ये आज ओबीसी हक्क परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मुंडन करत राज्य सरकारने तातडीने राजकीय आरक्षण लागू करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. सरकारकडून याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास विधानभवनावर धडक देण्याचा निर्धार यावेळी जाहीर करण्यात आला.
सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी हक्क परिषदेच्यावतीने सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर या मोर्चाच्या माध्यमातून सहभागी झालेल्या अनेक ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांनी मुंडण करत राज्य सरकारच्या ओबीसी आरक्षण धोरणाचा निषेध नोंदवला आहे. 54 टक्के इतका ओबीसी समाज असताना देखील समाजाचा राजकीय आरक्षण काढून घेतल्याने ओबीसी समाज हा मुख्य प्रवाहापासून बाजूला जाण्याची भीती यावेळी व्यक्त करत राज्य शासनाने याबाबत तातडीने पाऊले उचलावीत आणि ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण पुन्हा लागू करावे. अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.