वाहनचालकांचे रस्ते सुरक्षा अभियानाकडे दुर्लक्ष...
X
राज्यात सर्वत्र रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे. याबाबत तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम घेतले जात आहेत. मात्र या रस्ता सुरक्षा अभियानाचा जळगावमध्ये पुरता फज्जा उडताना दिसून येत आहे. राज्यात सर्वत्र रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात आहे. मात्र याकडे रस्त्यावरून ये-जा करणारे वाहन चालक याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत.
तर वाहन चालकांपर्यंत जनजागृती करण्यासाठी वाहतूक शाखा देखील कुठेतरी या कामी कमी पडताना दिसत आहे. रस्ता सुरक्षा अभियान हे फक्त बॅनर पुरते राहिले आहे की, काय असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. चोपडा तालुक्यात व जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहनधारक नियमांचे पालन करताना दिसत नाही. मोटरसायकल चालवताना मोबाईलवर बोलताना वाहनचालक दिसत आहेत. तर रिक्षामधून दाटीवाटीने प्रवासी वाहतूक सुरु असल्याचे दिसत आहे. काही बोटावर मोजण्याएवढे नागरिक नियमांचा पालन करताना दिसतात व हेल्मेट वापरताना दिसत आहे.
सर्वाधिक गंभीर गोष्ट आहे की, शालेय विद्यार्थी जे अल्पवयीन आहेत त्यांच्याकडे कुठलाही परवाना नाही. अशा विद्यार्थ्यांकडे त्यांचे पालक वाहन देत आहेत. हे विद्यार्थी सर्रासपणे विनापरवाना वाहनांचा वापर करताना रस्त्यावर दिसत आहेत . परंतु या विद्यार्थ्यांना व विद्यार्थ्यांच्या पालकांना समज देताना वाहतूक पोलीस अधिकारी कुठेतरी कमी पडताना दिसत आहेत. नियम आणि कायदा कितीही कठोर असला तरी त्याची अंमलबजावणी कितपत होते हा देखील प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.