पावसाळी अधिवेशन वेळेआधीच गुंडाळले, लोकसभा अनिश्चित काळासाठी स्थगित
X
Pegasus स्पायवेअर आणि केंद्रीय कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी सुरू ठेवलेल्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज केवळ २२ टक्के झाले असल्याची माहिती लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली आहे. लोकसभेचे कामकाज ठरलेल्या कालावधीच्या २ दिवसआधाची स्थगित करण्यात आल्याचे लोकसभा अध्यक्षांनी स्पष्ट केले. विरोधकांनी सातत्याने गोंधळ सुरू ठेवल्याने यंदाच्या सत्रात समाधानकारक काम होऊ शकले नाही असेही ओम बिर्ला यांनी सांगितले.
बुधवारी लोकसभेचे कामकाज सकाळी ११ वाजता सुरू झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित होते. लोकसभा अध्यक्षांनी चार दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर अधिवेशनाचे कामकाज आटोपते घेत असल्याचे सांगत त्यांनी १९ जुलै १० ऑगस्ट या कालावधीत किती कामकाज झाले याची माहिती दिली. अधिवेशनाच्या कालावधीत ९६ तास कामकाज करण्याचे नियोजन होते. पण विरोधकांनी सातत्याने गोंधळ सुरू ठेवल्याने केवळ २१ तास कामकाज झाल्याची माहिती लोकसभा अध्यक्षांनी दिली. त्यामुळे ७४ तास ४६ मिनिटांचा वेळ वाया गेला असे त्यांनी सांगितले.
या अधिवेशनात एकूण २० विधेयकं मंजूर झाली. यामध्ये १२७व्या घटना दुरूस्ती विधेयकाचा समावेश आहे. राज्यांना आरक्षण देण्याचे अधिकार बहाल कऱणाऱ्या या विधेयकाला सर्व पक्षांनी पाठिंबा दिल्याने केवळ या विधेयकावर शांततेत चर्चा होऊ शकली. "एवढ्या कमी प्रमाणात कामकाज झाल्याने आपण निराश झालो आहोत," असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले. सभागृहात जास्तीत जास्त काम झाले पाहिजे आणि जनहिताच्या गोष्टींवर चर्चा झाली पाहिजे, असा आपल्या प्रयत्न होता, असेही बिर्ला यांनी म्हटले आहे.
दरम्यान लोकसभेचे कामकाज संपल्यानंतर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, अधीर रंजन चौधरी तसेच इतर पक्षांच्या नेत्यांनी प्रथेप्रमाणे लोकसभा अध्यक्षांची त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते.