खतांच्या किंमत घट हा मोदींचा मास्टरस्ट्रोक: सदाभाऊ खोत
शेतकऱ्यांना दिलासा देत विरोधकांच्या विरोधाची धार बोथट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मास्टर स्ट्रोक लगावत खतांच्या किमती कमी केल्याचा दावा आमदार आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
X
केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किंमती कमी करून देशातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. रासायनिक खते ही भारतीय शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. युरिया वगळता पोटॅश आणि सिंगल सुपर फॉस्फेटवर आधारीत डीएपी सारखी संयुक्त खते आपण थेट आयात करतो. काही कंपन्या कच्चा माल आयात करून संयुक्त दाणेदार खते बनवतात. आयात होणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती वेळोवेळी बदलत असतात.
शिवाय जागतिक पातळीवर रासायनिक खतांच्या किंमती वाढल्या की आयात केलेल्या संयुक्त खतांच्या किमती वाढतात. शिवाय वेगवेगळ्या करामुळे किंमतीत फरक वाढतो. वाढलेल्या किंमती विचारात घेऊन हमीभाव ठरवले जातात. पण यामध्ये वेळ जातो. दुसरीकडे कच्च्या मालाच्या किमती, कर, आयात खतांचे वाढलेले दर यामुळे कंपन्या दर वाढविण्यासाठी सरकार वर दबाव टाकत असतात. खते सरकारने नियंत्रण मुक्त केल्यामुळे कंपन्या दर वाढवून रिकाम्या होतात. (बाजारात सध्या वाढीव दराची पोती सोशल मीडिया वर पहायला मिळतात.)
दर वाढले की टपून बसलेले विरोधी पक्षाच्या हातात आयते कोलीत सापडते. सध्या असेच झाले आहे. परंतु केंद्र सरकारचे तिकडे लक्ष असते. रयत क्रांती संघटना ही या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होती. राज्याच्या बैठकीत यावर चर्चा होवून अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी मला यावर तातडीने लक्ष घालायला सांगितले. यावर गेले दोन तीन दिवस मी सातत्याने केंद्रात संपर्क साधून कंपन्या करीत असलेल्या खत दरवाढीविषयी शेतकऱ्यांत मोठ्या प्रमाणात पसरलेल्या असंतोषाची माहिती दिली. केंद्र सरकारने तातडीने देशातील शेतकऱ्यांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर तोडगा काढत खतांच्या अनुदानात भरघोस वाढ करुन या विषयावर पडदा टाकला व विरोधाची धार बोथट करतानाच शेतकऱ्यांविषयीची बांधिलकी स्पष्ट केली. याबद्दल आम्ही रयत क्रांती संघटनेकडून मोदी सरकारचे अभिनंदन करतो, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.