तर दहीहंडी पथकांच्या पाठीशी मनसे खंबीरपणे उभी राहणार-जाधव
X
ठाणे : कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकारने दहीहंडीला परवानगी नाकारणे संतापजनक आहे. राजकीय दौरे,मेळावे तसेच गर्दीतील कार्यक्रम करणाऱ्या सरकारकडुन केवळ मराठी जनांच्या सणांवरच आक्षेप आणि निर्बंध लादले जात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या निर्णयाला कडाडून विरोध करत आहे. एकतर दहीहंडी संबंधात आज मुख्यमंत्र्यासमवेत पार पडलेल्या समन्वय समितीच्या बैठकीला विश्वविक्रम केलेल्या एकाही नामांकित गोविंदा पथकांना निमंत्रित केले गेले नव्हते. जे उपस्थित होते त्यांना तर बोलूही दिले नाही. केवळ टास्क फोर्सने आपले कोविड पालुपद सुरू ठेवल्याचा आक्षेप या बैठकीला उपस्थित असलेल्या प्रतिनिधींनी नोंदवला आहे. याचाच अर्थ सरकारला तरुणाईच्या इच्छा आकांक्षाशी काही देणे घेणे नाही. असं म्हणत मनसे ने सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
गेली दोन वर्षे ही तरुण मंडळी दहीहंडीचा सण साजरे करू शकलेले नाहीत. गणेशोत्सवाला परवानगी आणि दहीहंडी साठी कोविडचा बाऊ हा कुठला न्याय ! किमान त्यांच्या मानसिकतेचा तरी विचार सरकारने करायला हवा.तेव्हा,कितीही बंधने घातली, गुन्हे दाखल केले तरी दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांच्या पाठीशी मनसे ठामपणे उभी राहील असा थेट इशाराच मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सरकारला दिला आहे.
त्यामुळे दहीहंडी साजरी करण्यावरून महाविकास आघाडी सरकार आणि मनसे यांच्यात जोरदार संघर्ष होण्याची शक्यता आहे. दरम्यान दहीहंडी साजरी करण्यास शासनाने परवानगी न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा अनेक गोविंदा पथकांनी दिला आहे. यावर आता सरकार के भूमिका घेत हे पाहणं येत्या काळात महत्वाचे ठरणार आहे.