भाजपाला स्थापनादिनाच्या "मनसे" शुभेच्छा
X
मनसे (MNS)अध्यक्ष राज ठाकरे (raj thackrey) यांनी गुढीपाडव्यादिवशी शिवतिर्थावर जाहिर सभा घेतली होती.या सभेत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर जाहिरपणे टिका केली.या सभेनंतर राज ठाकरेंवर भाजपचा स्पीकर म्हणून टिका सुद्धा झाली होती.येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मनसे भाजप युती होईल की काय या चर्चा सुरु असतानाच आज भाजपाच्या स्थापनादिनानिमित्त मनसेने भाजपाला शुभेच्छा दिल्या आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य पातळीवर भाजपाशी जुळवून घेतल्याचे संकेत गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून दिले होते.त्याचबरोबर केंद्रातील भाजपाचे बडे नेते मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari)यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली होती.यावरुन दोन पक्ष एकत्र येणार कि काय अशा चर्चा सुरु आहे.
औरंगाबादेत (aurangabad) मनसचे शहर-जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी भाजपच्या स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांना भाजप स्थापना दिनाच्या शुभेच्छा देणारे ट्विट केले असून प्रत्यक्ष भेटून देखील ते शुभेच्छा देणार आहेत.
महाविकास आघाडीमुळे शिवसेनेला उघडपणे हिंदुत्वाची भूमिका घेता येत नसल्याने मनसेने या संधीचा पुरेपूर फायदा उठवण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. संभाजीनगरच्या नामांतराचा मुद्दा हा त्याचच एक भाग म्हणावा लागेल. स्थानिक पातळीवर सध्या मनसे आणि भाजपचे सुर जुळले असून स्वंतत्रपणे पण सारख्याच मुद्यांवर हे दोन्ही पक्ष महाविकास आघाडीच्या विरोधात मैदानत उतरल्याचे पहायला मिळाले.
मुंबई महापालिके प्रमाणेच औरंगाबाद (aurangabad) महापालिकेच्या निवडणुका देखील येत्या काही महिन्यात होण्याची शक्यता आहे. शिवसेना-भाजप या गेली अनेक वर्ष एकत्रित निवडणुका लढलेल्या आणि सत्तेत असलेल्या पक्षांमध्ये आता फाटले आहे. त्यामुळे भाजपला नव्या मित्राचा शोध आहे. तर शहर व जिल्ह्यात फारशी ताकद नसलेल्या मनसेला देखील कुणाच्या तरी मदतीची गरज निवडणुकीत भासणार आहे.