विधानसभेत आमदार यशोमती ठाकूर झाल्या भावूक
माजी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर या विधानसभेत चौथ्या आधुनिक महिला धोरणावर बोलताना भावूक झाल्याचे पहायला मिळाले.
X
राज्याच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात जागतिक महिला दिनानिमीत्त दिवसभर महिलांच्या प्रश्नांवर चर्चा सुरु आहे. यामध्ये माजी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर चौथ्या महिला धोरणात करावयाच्या उपाययोजनांवर बोलत असताना भावूक झाल्याच्या पहायला मिळाल्या.
यावेळी यशोमती ठाकूर म्हणाल्या, एखाद्या विषयावर तिला बोलायचं असेल तर ती बोलू शकली पाहिजे. घरामध्ये निर्णय प्रक्रीयेमध्ये देखील तिचा सहभाग असला पाहिजे. आपण मालमत्ता महिलांना दिले आहेत. आपण नियम बनवले आहेत पण खऱ्या अर्थाने महिलांची नावं सातबाऱ्यावर चढतात का? तर माझं उत्तर आहे नाही. त्याचं महत्वाचं कारण मी स्वतःच्या उदाहरणातून सांगते. यामध्ये माझे यजमान गेल्यानंतर मला संघर्ष करावा लागला. मी तर मोठ्या घरातली होती, मोठ्या घरामध्ये माझं लग्न झालं होतं. म्हणजे मी एकदम आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या डाऊन प्रॉडक्ट नव्हते. पण तरीही माझ्या मुलांनी नावं सातबाऱ्यावर लावण्यासाठी एका महिलेला संघर्ष करावा लागतो, ही वस्तुस्थिती आहे.
माझ्या यजमानांना जाऊन अठरा वर्षे झाले. पण अजूनही माझ्या मुलांच्या नावे त्यांच्या हक्काची संपत्ती होऊ शकली नाही, ही वस्तुस्थिती आहे. मला महिलांच्या कायद्याची माहिती आहे. एवढंच नाही तर मी महिला व बालकल्याण मंत्री राहिले आहे. त्यामुळे या गोष्टी सभागृहाच्या रेकॉर्डवर आणते. यामध्ये मला जर हा त्रास होत असेल तर सामान्य महिलांना काय त्रास होत असेल, हा विचारही तुम्ही करू शकत नाहीत, असं मत व्यक्त करताना यशोमती ठाकूर भावूक झाल्या.