Home > News Update > नवाब मलिकांचा बार फुसका, भाजपावर आरोप करणारे तोंडघशी पडले !-आमदार निरंजन डावखरे

नवाब मलिकांचा बार फुसका, भाजपावर आरोप करणारे तोंडघशी पडले !-आमदार निरंजन डावखरे

नवाब मलिकांचा बार फुसका, भाजपावर आरोप करणारे तोंडघशी पडले !-आमदार निरंजन डावखरे
X

ठाणे : राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी किरण गोसावी हा भाजपा आमदाराच्या पत्नीच्या कंपनीत संचालक असल्याबद्दल केलेला आरोपाचा बार फुसका ठरला आहे. असं म्हणत भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी आज थेट `मायक्रोबायॉलॉजिस्ट' असलेल्या किरण गोसावींना पत्रकार परिषदेत समोर आणले आहे, आणि नवाब मलिकांसह सोशल मिडियावर भाजपाला आरोपींच्या पिंजऱ्यात बसविणारे तथाकथित समाजमाध्यम कशी तोंडघशी पडली आहेत असा घणाघात केला.

भाजपा आमदार निरंजन डावखरे यांच्या पत्नी निलिमा डावखरे आणि किरण गोसावी एका कंपनीत संचालक असल्याचे स्नॅप शॉट्स काल समाजमाध्यमांवर प्रसारीत झाले होते. मंत्री नवाब मलिकांच्या पत्रकार परिषदेनंतर दहा-पंधरा मिनिटांनंतर स्नॅप शॉट्स व्हायरल झाले. त्यामुळे भाजपाविरोधात आर्यन खानच्या माध्यमातून स्वत:चा पर्सनल अजेंडा राबविण्याचा प्रयत्न करणारे तोंडघशी पडले आहेत, अशी टीका आमदार निरंजन डावखरे यांनी केली.

मित्र परिवाराने आणलेला गांजा पिऊन व खोटी माहिती देऊन कोणीही दिशाभूल करू नये, असा टोला आमदार डावखरे यांनी मारला. किरण प्रकाश गोसावी यांचे नामसाधर्म्य आढळल्यानंतर टणाटणा उड्या मारून बदनामी करण्याचा डाव शिजला, असा आरोप आमदार निरंजन डावखरे यांनी केला. केवळ ४००-४५० रुपये भरून सविस्तर माहिती घेण्याऐवजी शहानिशा न करता हेतुपुरस्सर आरोप करण्यात आले, असे डावखरे यांनी सांगितले.

मंत्री नवाब मलिक यांनी दीड महिन्यानंतर होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात गौप्यस्फोट करण्याचे जाहीर केले. मात्र, हिवाळी अधिवेशनात राज्यातील शेतकरी, पूर परिस्थिती, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबतची चर्चा टाळण्याबरोबरच विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे असंही आमदार डावखरे यांनी म्हटले आहे. दरम्यान, गेल्या ७ ऑक्टोबर रोजी पुणे पोलिसांकडून माझ्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांना मी माझी कागदपत्रे व पासपोर्ट दाखविला. केवळ नावात सारखेपणा असल्यामुळे मला नाहक त्रास झाला, असे किरण गोसावी यांनी सांगितले.

दरम्यान समाजमाध्यमांमध्ये `स्नॅप शॉट्स' व्हायरल करून बदनामी केल्याप्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात येईल. तसेच दोषींविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात येईल, अशी माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.

Updated : 30 Oct 2021 6:34 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top