आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांकडून अटक ; वीज बिल वसुलीविरोधात भाजप आक्रमक
X
अहमदनगर// महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाने शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी वीजपुरवठा खंडीत केला आहे. या राज्य कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्या आमदार मोनिका राजळे व भाजपा कार्यकर्त्यांना शेवगाव पोलिसांनी अटक केली आहे.
कृषी पंपाच्या थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेती पंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. महावितरणच्या या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्यावतीने शेवगाव शहरातील गाडगेबाबा चौकात सोमवारी सकाळी 10.30 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले,शेवटी कोणताही निर्णय होत नसल्याने नाईलाजाने पोलिस प्रशासनाने आमदार मोनिका राजळे व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले, व त्यांना शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये आणून नंतर सोडून देण्यात आले.
आंदोलनादरम्यान महावितरणच्या अधिकार्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मात्र चर्चा मान्य न झाल्याने सकाळी 10.30 वाजता सुरू झालेले आंदोलन दुपारी 2.10 वाजेपर्यंत सुरूच होते. प्रशासनानेही आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र मागणी मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने पोलिसांनी आंदोलकांना अटक केली.
अटक केलेल्यांमध्ये आमदार मोनिका राजळे यांच्यासह भाजपाचे तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बापुसाहेब पाटेकर, ओबीसी मोर्चाचे संभा जायभाये शहराध्यक्ष रवी सुरोसे, गंगा खेडकर, नितीन दहिवाळकर, नगरसेवक महेश फलके, वाय. डी. कोल्हे, कचरू चोथे आदींचा समावेश आहे.
आंदोलकांना अटक करून पोलिसांनी बळजबरीने पोलीस गाडीमध्ये बसवून पोलीस ठाण्यात आणले. पोलीस ठाण्यात आल्यानंतरही आंदोलकांनी घोषणाबाजी करत पोलीस ठाण्याच्या दारातच ठिय्या दिला. रास्तारोको दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.