'ठाकरे सरकार ड्रग्ज माफियांच्या तालावर नाचते आहे' ; भाजप आमदार अतुल भातखळकर यांची टीका
X
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो आणि कागदपत्रांचे फोटो ट्वीट करुन एकच खळबळ उडवून दिली. मलिक यांनी 'पहचान कौन?' असं म्हणत वानखेडे यांच्या पहिल्या लग्नातील फोटो ट्वीट केला. तर दुसऱ्या एका ट्वीटमध्ये त्यांनी वानखेडे यांच्या जन्म दाखलाचा फोटो शेअर करत 'इथूनच घोटाळा सुरु झाला' असा आरोप केला. समीर वानखेडे यांनी नाव आपले नाव समीर दाखवून आपला धर्म मुस्लिम असल्याचा उल्लेख केला आहे असं ट्वीट मलिक यांनी केलं.
Pehchan kaon? pic.twitter.com/S3BOL4Luc8
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 25, 2021
दरम्यान, नवाब मलिक यांच्या या आरोपांवरुन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकार आणि मलिक यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
'एका मराठी अधिकाऱ्याविरुद्ध शिवसेनेचा मुख्यमंत्री असलेले तिघाडी सरकार आकाश पाताळ एक करते आहे. ड्रग्ज माफियांच्या विरोधात कारवाई केली म्हणून या अधिकाऱ्याला धडा शिकवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरसावले आहेत. ड्रग्ज माफियांच्या तालावर ठाकरे सरकार नाचते आहे', अशी खोचक टीका भातखळकर केली आहे.
एका मराठी अधिकाऱ्याविरुद्ध शिवसेनेचा मुख्यमंत्री असलेले तिघाडी सरकार आकाश पातळ एक करते आहे. ड्रग्ज माफियांच्या विरोधात कारवाई केल्याबद्दल त्याला धडा शिकवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरसावले आहेत. ड्रग्ज माफियांच्या तालावर ठाकरे सरकार नाचते आहे.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 25, 2021
तसेच 'NCB चे डायरेक्टर समीर वानखेडे यांचे बोगस सर्टिफिकेट मलिक यांनी ट्विट केले आहे. वानखेडे हिंदू नसून मुस्लीम असल्याचा खोडसाळ दावा त्यांनी केला आहे. ड्रग्ज माफियांचे प्रवक्ते बनलेल्या मलिक यांच्याविरुद्ध बनावट कागदपत्रे बनविणे आणि दोन समाजात तेढ निर्माण करण्याबद्दल FIR दाखल करावा', अशी मागणीच भातखळकर यांनी केली आहे.
दरम्यान आता ड्रग्ज प्रकरणाला वेगळच वळण लागले असून , यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. दरम्यान यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील मलिक यांच्यावर जोरदार टीका केली आहे, मलिक यांनी वानखेडे यांचे वैयक्तिक फोटो शेअर करून अतिशय खालच्या पातळीचे राजकारण केल्याचे त्यांनी म्हटले आहे, महाराष्ट्राची ही संस्कृती नाही, हे अतिशय दुर्दैवी आहे असं वाघ म्हणाल्या.