Home > News Update > मंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहतूक पोलिसांसोबत साजरी केली दिवाळी

मंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहतूक पोलिसांसोबत साजरी केली दिवाळी

मंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहतूक पोलिसांसोबत साजरी केली दिवाळी
X

ठाणे : प्रत्येक सणाला पोलीस आपले कर्तव्य करत रस्त्यावर दक्ष असतात म्हणून आपण आनंदाने आणि सुखाने दिवाळी साजरी करू शकतो, वाहतूक पोलिसांच्या याच कर्तव्यभावनेची जाण राखून नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे शहर वाहतूक पोलिसांसोबत दिवाळी साजरी करून त्यांचा सण खऱ्या अर्थाने गोड केला.

ठाणे शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत गजबजलेला चौक म्हणून ओळख असलेल्या तीन हात नाका येथील वाहतूक नियंत्रण कार्यालयात आज एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. महिला आणि पुरुष वाहतूक पोलीस आणि अधिकारी सारे जण मोठ्या आनंदात आणि उत्साहात होते. कारण मंत्री एकनाथ शिंदे हे आज खास त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी येणार होते.

एकनाथ शिंदे यांनी खास दिवाळीच्या निमित्ताने खास वाहतूक पोलिसांची भेट घेऊन त्यांना फराळ आणि मिठाईचे वाटप केले. वाहतूक पोलीस दिवसरात्र शहरातील वाहतुकीची व्यवस्था पाहण्यासाठी काम करतात. दिवाळीसह प्रत्येक सणाला आपल्या कुटूंबापासून दूर राहून कर्तव्य बजावतात त्यामुळे त्यांच्या कामाची दखल घेण्यासाठी आज पाडव्याच्या निमित्ताने आज इथे आलो असल्याचे शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.

प्रत्येक सणाला पोलीस दक्ष राहून काम करतात कोरोना काळात देखील कर्तव्य निभावताना अनेक पोलिसांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन काम केले. अनेकदा ऊन पाऊस याची तमा न बाळगता ते रस्त्यावर उभे असतात. तसेच अनेकदा यंत्रणा उशिरा पोहोचतात तेव्हा स्वतः तातपुरते रस्ते दुरुस्त करून वाहतूक नीट करण्याचे काम देखील वाहतुक पोलीस करत असल्याचे व्हिडीओ आपण पाहतो. अशावेळी त्यांना देखील आपल्या कुटूंबासोबत दिवाळी साजरी करावीशी वाटते पण कर्तव्यभावनेमुळे त्यांना काम करावे लागते. त्यांच्या याच कर्तव्यनिष्ठतेची जाण ठेवून आजच्या या दिवाळीचा पाडवा पोलीस बांधवांसोबत साजरा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मत शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं.

यावेळी ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग, वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, ठाणे वाहतूक पोलिसांचे ब्रँड अंबेसिडर अभिनेते मंगेश देसाई, नगरसेवक राजेश मोरे, संजय मोरे हे देखील उपस्थित होते.

Updated : 5 Nov 2021 4:58 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top