परीक्षा पास होण्यासाठी पैसे देणाऱ्यांना दणका, म्हाडाच्या परीक्षेबाबत जितेंद्र आव्हाड यांची मोठी घोषणा...
X
राज्यात एकीकडे आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या पेपरफुटीचे प्रकरण ताजे असताना आता म्हाडातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये पैशांची देवाण-घेवाण होत असल्याचे समारे आले आहे. ही धक्कादायक माहिती खुद्द गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. तसेच कुणी पैसे मागत असेल किंवा उमेदवारांनी पैसे दिले असतील ते परत घ्या, या परीक्षा अत्यंत पारदर्शकपणे होणार असल्याचे सांगत जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी मोठी घोषणा केली आहे.
म्हाडातर्फे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. एकूण ५३५ जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. १२ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या परीक्षांबाबत गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी आल्याचे सांगत गृहनिर्माण मंत्री यांनी उमेदवारांना आवाहन केले आहे. अफवांना बळी पडू नका, परीक्षा अत्यंत पारदर्शकपणे होणार आहेत. यामध्ये गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांवर पोलीस कारवाई करण्यात येईल, असे आव्हाड यांनी सांगितले, आहे.
"गैरप्रकार आढळला तर पुन्हा परीक्षा घेणार"
म्हाडाच्या परीक्षेबाबत राज्यात अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. पण गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. आता होणारी पहिली परीक्षा ही प्रिलिमनरी असेल आणि मुख्य परीक्षा मुंबईत होणार आहे, तसेच म्हाडातर्फे ही परीक्षा आयोजित केली जाईल, असेही जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केली आहे. तसेच पोलिसांनी देखील असे प्रकार रोखावे, असे आवाहन त्यांनी केली आहे. त्याचबरोबर गैरप्रकार आढळला तर परीक्षा पुन्हा घेतली जाईल अशीही घोषणा आव्हाड यांनी केली आहे.