Home > News Update > मेधा पाटकर यांनी ED कारवाईचे आरोप फेटाळले

मेधा पाटकर यांनी ED कारवाईचे आरोप फेटाळले

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर (Medha patkar) यांच्यावर ED ने कारवाई केल्याच्या बातम्या माध्यमांमधून समोर येत होत्या. त्यावर मेधा पाटकर यांनी ED ने कारवाई केल्याचे वृत्त खोटे असल्याचे सांगत फेटाळले आहे.

मेधा पाटकर यांनी ED कारवाईचे आरोप फेटाळले
X

नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर यांच्यावर ED ने कारवाई केल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या होत्या. त्यावर मेधा पाटकर यांनी माध्यमांशी बोलताना हे वृत्त फेटाळले आहे. त्याबरोबरच मला आणि नर्मदा नवनिर्माण आंदोलनाला बदनाम करण्यासाठीचे हे कारस्थान असल्याचा आरोप मेधा पाटकर यांनी केला आहे. (Medha patkar denied allegation)

मेधा पाटकर यांच्या विरोधात गाझियाबाद भाजपचे जिल्हा सचिव संजीव झा (BJP District chief sanjiv Jha) यांनी तक्रार दिली होती. त्यामध्ये मेधा पाटकर यांनी 2005 साली आंदोलनासाठी जमा करण्यात आलेल्या पैशांच्या माध्यमातून मनी लाँडरींगच्या माध्यमातून राजकीय षडयंत्र रचल्याचा आरोप केला होता, त्यावरून मेधा पाटकर यांना ईडीची नोटीस आली, त्यांच्यावर FIR दाखल झाल्याच्या बातम्या प्रसिध्द करण्यात आल्या होत्या. मात्र या सर्व प्रकरणावर मेधा पाटकर यांनी आज खुलासा केला.

मेधा पाटकर म्हणाल्या की, मला आणि आंदोलनाला बदनाम करण्यासाठी ED ची नोटीस आली, ED ने FIR दाखल केला, चौकशी केली, अशा प्रकारच्या बातम्या प्रसिध्द केल्या जात आहेत. तर या बातम्या दाखल केलेल्या तक्रारीच्या माध्यमातून नियोजनबध्दरित्या प्रसारित केल्या जातात. मात्र मला किंवा संस्थेला अशा प्रकारची कोणतीही ईडीची नोटीस आली नाही. तसेच आमच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्याबाबत कोणत्याही प्रकारे माहिती मिळाली नाही. त्यामुळे करण्यात येणारे सर्व आरोप हे फक्त मला बदनाम करण्यासाठी आहेत, अशे म्हणत मेधा पाटकर यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

मेधा पाटकर म्हणाल्या की, 2004 साली संस्थेच्या खात्यावर असलेली रक्कम पुढे 2005 मध्येही तेवढीच होती. तीच रक्कम 20 वेगवेगळ्या लोकांकडून आमच्या खात्यात जमा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र अशा कोणत्याही प्रकारची रक्कम आमच्या खात्यात जमा झाली नाही. त्याबाबत आमच्या बँक खात्याचा पुरावा मानण्यात येऊ शकतो. तसेच माझगाव डॉक या सार्वजनिक कंपनीने नर्मदा नवनिर्माणच्या शाळांसाठी केलेल्या मदतीबाबत सर्व बाबी पुर्ण केल्या आहेत. तर या कंपनीने नवनिर्माणला मदत करण्यासाठी नंदुरबारचे तात्कालिन जिल्हाधिकाऱ्यांनी शिफारस केली होती. त्यामुळे हा डाव फक्त मला आणि आंदोलनाला बदनाम करण्यासाठी असल्याचे मेधा पाटकर यांनी सांगितले.

Updated : 17 April 2022 11:50 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top