Home > News Update > भांडूप ड्रीम मॉलच्या आगीला सत्ताधारी जबाबदार: फडणवीस

भांडूप ड्रीम मॉलच्या आगीला सत्ताधारी जबाबदार: फडणवीस

महाविकास आघाडीवर सातत्याने आरोप करणारे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आता मुंबईत भांडूप ड्रीम मॉलमधील तात्पुरत्या कोविड सेंटरच्या आगीसाठी मुंबई मनपा आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचा थेट आरोप करत आता न्यायालयानेच हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे.

भांडूप ड्रीम मॉलच्या आगीला सत्ताधारी जबाबदार: फडणवीस
X

भांडुपच्या ड्रीम्स मॉलमधील कोविड सेंटरमध्ये लागलेल्या आगीत १० लोकांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी आहे. सकाळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. या घटनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई महापालिकेचे झालेले अक्षम्य दुर्लक्ष कारणीभूत असल्याचे त्यांनी थेट म्हटले आहे.

भंडाऱ्यात नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यभरात आरोग्य केंद्र, हॉस्पिटलमध्ये फायर ऑडीटचे आदेश दिलेले. मग इथे फायर ऑडीट का झाले नाही? या इमारतीला ओसी नसताना इथे कोविड सेंटर सुरु करायला परवानगी कशी दिली? असा सवालही फडणवीसांनी उपस्थित केला आहे.

या इमारतीतून बचाव करण्यासाठी रेस्क्यूचा पर्यायही नव्हता. त्यामुळे रुग्णांनाही स्वत:चा जीव वाचवता आला नाही, तसेच अग्निशमन दलालाही बचावकार्यात अडथळे आले. त्यामुळे एकंदरीतच याला मुख्यमंत्री आणि मुंबई महापालिका जबाबदार आहे. आगीप्रकरणी सरकारचं अक्षम्य दुर्लक्ष आहे. मुंबई महापालिका भ्रष्टाचाराने पोखरून गेली आहे, त्यामुळे न्यायालयानेच सुओ मोटो घेऊन याप्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

Updated : 26 March 2021 3:12 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top