मॅक्स महाराष्ट्रचा दणका, मॅक्स महाराष्ट्राच्या बातमीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निलंबनाचा प्रस्ताव | MaxMaharashtra Impact :
बोरीचीवाडी येथील सर्पदंशाने बालमृत्यू प्रकरणासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रने केलेल्या बातमीची दखल घेत या आरोग्य अधिकाऱ्याच्या निलंबनाचा प्रस्ताव सरकारला सादर करण्यात आला आहे.
X
पालघर : मोखाडा तालुक्यातील सायदे पैकी बोरीचीवाडी येथील छाया सखाराम भोई (7) या बालिकेचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला होता. खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात या बालीकेवर वेळेत ऊपचार केले नसल्याचा आरोप तीच्या पालकांनी केला होता.या घटनेनंतर तीव्र पडसाद उमटले होते.
23 मे रोजी लाल बावटा पक्षाने प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून आरोग्य विभागाचा तीव्र निषेध नोंदवत, प्राथमिक आरोग्य केंद्रात ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनात आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. मॅक्स महाराष्ट्रने या गंभीर प्रकरनाचा पाठपुरावा करत आरोग्य व्यवस्थेचा गलथान कारभार चव्हाट्यावर आणला होता. याची दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सुर्यवंशी यांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याची तातडीने बदली केली आहे. याचबरोबर त्याच्या निलंबनाचा प्रस्ताव सरकारला पाठवला आहे.
या घटनेची दखल घेत, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दयानंद सुर्यवंशी यांनी खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. तसेच आंदोलन कर्त्यांच्या प्रक्षोभक भावना जाणून घेतल्यानंतर येथील वैद्यकीय अधिकारी स्वप्नील वाघ यांची तडकाफडकी बदली केली असून निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचे जि प अध्यक्ष प्रकाश निकम व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दयानंद सुर्यवंशी यांनी सांगितले आहे.
मोखाड्यातील सायदे बोरीचीवाडी येथील सखाराम भोई यांची मुलगी छाया अंगणात खेळत असताना तीला सर्पदंश झाला. यावेळी तीच्या पालकांनी तीला दुचाकीवरुन खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात ऊपचारासाठी दाखल केले होते. मात्र, येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्याचे निदान झाले नाही.असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. छाया वर जुजबी ईलाज केला. त्यामुळे त्याच रात्री 11 : 30 वाजता छाया चा दुर्दैवी मृत्यू झाला होता. सदरची घटना 16 मे ला घडली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा मुळे च आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप सखाराम भोई यांनी केला आहे.
प्रतिकात्मक प्रेतयात्रा
या घटनेनंतर भारताचा कम्युनिस्ट लेनिनवादी पक्ष, (लाल बावटा) खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रापासून थेट बाजारपेठ ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून आरोग्य विभागाचा तीव्र निषेध नोंदवला आहे.या प्रेतयात्रेत लालबावट्याने आरोग्य विभागाच्या निषेधार्थ तीव्र शब्दांत घोषणाबाजी केली असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
जि प अध्यक्षांनी दिली कुटूंबियांना भेट
खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भेटी नंतर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी बोरीचीवाडी येथे जावून छाया च्या कुटूंबियांचे सांत्वन केले असून त्यांना आर्थिक मदतही देवू केली आहे.