Home > News Update > "मॅक्स महाराष्ट्र"च्या चिंतन वार्षिकांकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

"मॅक्स महाराष्ट्र"च्या चिंतन वार्षिकांकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

मॅक्स महाराष्ट्रच्या चिंतन वार्षिकांकाचा प्रकाशन सोहळा संपन्न
X

Max Chintan Prakashan : मॅक्स महाराष्ट्रच्या 'चिंतन' वार्षिक अंक प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम काल (दि. 5 मार्च) यशवंतराव चव्हाण केंद्र, नरिमन पॉईंट, मुंबई येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार,वैद्यकीय शिक्षण विभागाचे माजी संचालक डॉ.तात्यासाहेब लहाने.ज्येष्ठ संपादक आणि विचारवंत ज्ञानेश महाराव,लोकजागर मंचचे संस्थापक अनिल गावंडे,मॅक्स महाराष्ट्रचे संचालक रविंद्र आंबेकर,कार्यकारी संपादक मनोज भोयर आणि 'मॅक्स वूमन'च्या संपादक प्रिंयदर्शनी हिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून चिंतन वार्षिकांक मोठ्या थाटात प्रकाशित करण्यात आला.

मॅक्सटीमने सर्व मान्यवरांचे स्वागत 'चिंतन वार्षिकांक' आणि सन्मान चिन्ह देऊन केले. कार्यकारी संपादक मनोज भोयर यांनी चिंतन वार्षिकांक प्रकाशनामागील भूमिका विषद केली.






महाराष्ट्रात तंत्रज्ञान खात्याचा मंत्री हवाय - आशिष शेलार


तंत्रज्ञानाचे महत्व मानवी आयुष्यात आहेच आणि ते दिवसागणिक वाढत चालले असताना महाराष्ट्रात मंत्रिमंडळात तंत्रज्ञान खात्याचे स्वतंत्र कार्यभार सांभाळणारे मंत्री का नाही असा सवाल भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी यावेळी उपस्थित केला. या खात्यासाठीमंत्री आणि काम करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी वर्ग सुद्धा हवाय असं मत त्यांनी व्यक्त केलंय.

"मॅक्स महाराष्ट्र"ने निर्माण केली वेगळी ओळख - आशिष शेलार

आशिष शेलार या प्रकाशन सोहळ्यात बोलताना म्हणाले की, मॅक्स महाराष्ट्राची ओळख ही इतर वर्तमानपत्रे किंवा डिजिटल मिडियात काम करणाऱ्या पोर्टल्स किंवा चॅनलसारखी ठोकताळ पध्दतीची नाही. मॅक्स महाराष्ट्र अत्यंत वेगळ्या धाटणीचे डिजिटल चॅनल आहे. ज्यांनी समाजातल्या वेगवगेळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना आणि तज्ज्ञ लोकांना सोबत घेत वेगळं चिंतन समाजासमोर मांडलं आहे.

आशिष शेलार यांनी मॅक्स महाराष्ट्रचे यावेळी भरभरून कौतुक करत आवर्जून सांगितले की मॅक्सने माध्यमांमध्ये आगळी-वेगळी ओळख निर्माण केली आहे.

मॅक्स महाराष्ट्रने असेच आपले मुक्त व्यासपीठ कायम ठेवावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.





लोकशाहीची हत्या होत नसून तिचा गैरवापर - ज्ञानेश महाराव

'लोकशाही संवाद' या विषयावर बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ज्येष्ट संपादक आणि विचारवंत ज्ञानेश महाराव म्हणाले की,लोकशाहीची हत्या झाली.अशी खंत कायम व्यक्त केली जाते. लोकशाहीची हत्या कधी होऊ शकत नाह तर तिचा गैरवापर होतो आहे. राजेशाही, हुकूमशाही किंवा आणखी काही शाही असतील त्यांच्या उरावर बसून ही लोकशाही जन्माला येत असते. त्यामुळे तिची हत्या कधी होऊ शकत नाही असं परखड मत महाराव यांनी व्यक्त केलं.

महाराव यांनी भाजपातील सत्ताधारी नेत्यांची हिटलरशी तुलना करताना भाजपावर निशाणा साधला. ते म्हणाले की, अनेक जण म्हणतात की, देशात हुकूमशाही येईल, हिटलरशाही येईल. हे हिटलर बनण्याच्या पण लायकीचे नाहीत, हिटलर तरी हिंमतबाज होता. यांना आम्ही हूकुमशहा आहोत असं म्हणण्याची सुध्दा हिंमत नाहीये. ते हूकुमशाही आणणार नाहीत परंतु लोकशाहीचा गैरवापर करण्यावर ते हूकुमत निर्माण करतील, आणि ही हुकूमत त्यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये निर्माण केलेली आहे.




डॉ. तात्यासाहेब लहाने यांचा उपस्थितांना निरोगी आरोग्याचा सल्ला

मॅक्स महाराष्ट्र च्या चिंतन वार्षिकांक प्रकाशनाच्या कार्यक्रमप्रसंगी बोलताना डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी उपस्थितांना निरोगी आरोग्याचा सल्ला देत इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्यावर कसा वाईट परिणाम होतोय याबाबत माहिती दिली. त्याचबरोबर आधुनिक शेती कशा पध्दतीची असावी याविषयीसुध्दा त्यांनी मार्गदर्शन केले.

डॉ. लहाने म्हणाले की, आपण आरोग्याला अगदी शेवटचं स्थान दिलेलं आहे. आजारी पडल्यानंतरच आपल्याला दवाखान्याचा रस्ता दिसतो. तसं न करता आपण नियमितपणे आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली पाहीजे.

मोबाईलचा मानवी आयुष्यातला अतिरेकी वापर इतका टोकाला गेलाय की त्यामुळे त्यांच्या डोळ्यावर त्याचे विपरीत परिणाम होत नाहीये तर इतर आजारांना सुद्धा यामुळे लोक बळी पडतात याची त्यांना माहितीच नसते असं सांगून डॉ. लहाने यांनी मॅक्सच्या व्यासपीठावरुन सर्वांचा धोक्याचा इशारा देत सजग केले.




लोकजागर मंचचे संस्थापक अनिल गावंडे यांनी ग्रामविकासासाठी जी चळवळ अकोला जिल्हयातल्या अकोट तालुक्यात उभारली. त्याबद्दल माहिती दिली. राजकारणात प्रस्थापित होण्यासाठी ग्रामविकासावर भर देण्याऐवजी नसते उद्योग सुरु आहे असं सांगत महिला आणि युवकांसाठी काम करण्याची नेमकी गरज असल्याचं मत त्यांनी मांडले.





  • मॅक्सच्या चिंतन अंकाचे मान्यवरांकडून भाषणात जाहीर कौतूक
  • उपस्थितांनी स्वनिधी देत चिंतन अंक घेतला विकत
  • चिंतन अंकांचे उपस्थितांनी केले भरभरून स्वागत
  • कार्यक्रमाला अनेक संस्था आणि संघटनाचे प्रमुख आणि कार्यकर्ते हजर
  • मान्यवरांच्या भाषणाला उपस्थितांकडून प्रचंड दाद
  • ज्ञानेश महारावांच्या भाषणाला श्रोत्यांची सर्वाधिक पसंती
  • डॉ. तात्या लहाने यांच्या निरोगी आरोग्यासंदर्भात दिलेल्या टिप्स ठरल्या लक्षवेधी





या कार्यक्रमाला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मधुकर कांबळे, आणि त्यांचे कार्यकर्ते, ज्येष्ठ पत्रकार सुरेश ठमके, विकास महाडिक, विजय गायकवाड, लोकमित्र संजय सोनटक्के, बँकिंग तज्ज्ञ विश्वास उटगी, डॉ. राणी खेडीकर, उपजिल्हाधिकारी वंदना गेवराईकर, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार राजाभाऊ कांदळकर, ज्येष्ठ पत्रकार आणि नाट्यलेखक राकेश शिर्के, अहिल्यादेवी प्रबोधन मंचच्या कोकण विभागाचे अध्यक्ष अनिल झोरे उपस्थित होते. याशिवाय मॅक्स महाराष्ट्रची मुंबई टीम आणि राज्यभरातले अनेक प्रतिनिधी मॅक्स महाराष्ट्रचा चाहता वर्गाने या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रसिध्द कवियित्री सिध्दी ढोके यांनी केलं तर आभार प्रदर्शन मॅक्स महाराष्ट्रचे सहसंपादक सागर गोतपागर यांनी केलं.





Updated : 6 March 2024 7:53 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top