मुलूंडमध्ये मराठी Vs गुजराती वाद पेटला
X
मुंबईच्या मुलुंड पश्चिममध्ये कार्यालयासाठी जागा शोधणाऱ्या एका मराठी कुटुंबाला गुजराती नागरिकांकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा मुद्दा चांगलाच तापलाय. याप्रकऱणी पीडित कुटुंबातील महिलेनं सोशल मीडियाद्वारे आपल्याला मिळालेल्या वागणूकीचा व्हिडिओ शेअर केला. त्यानंतर हा मुद्दा पेटायला सुरूवात झालीय.
तृप्ती सागर देवरूखकर या आपल्या पतीसोबत मुलुंड पश्चिममध्ये कार्यालयासाठी जागा शोधत होत्या. त्याचवेळी त्यांनी शिवसदन या सोसायटीमध्ये चौकशी केली. यावेळी त्यांना तिथं उपस्थित असलेल्या गुजराती भाषिकांनी इथं मराठी लोकांना जागा मिळणार नसल्याचं सांगितलं...त्यावर देवरूखकर यांनी विचारणा केली असता गुजराती भाषिकांनी त्यांच्यासोबत अरेरावी केली. यावेळी तृप्ती यांनी या सर्व घटनेचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा मोबाईलही हिसकावून घेण्यात आला. या दरम्यान तृप्ती यांच्या पतीसोबतही गुजराती भाषिकांनी अरेरावी केली त्यात त्यांचा चष्मा फुटलाय. तृप्ती यांनी आपबितीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअऱ केलाय. ही घटना सांगतांना तृप्ती यांना अश्रूही अनावर झाले.
अवघ्या काही तासातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरला झाला. त्यानंतर मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी तृप्ती यांची भेट घेतली. दरम्यान, वाद घालणाऱ्या गुजराती भाषिक लोकांना याबाबत मनसेच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला. यावेळी देवरूखकर कुटुंबिय देखील उपस्थित होतं. त्यानंतर गुजराती भाषिक लोकांनी देवरूखकर यांची माफी मागितली.