भुजबळ, सदावर्तेंच्या वक्तव्याचा मराठा आरक्षण समर्थकांकडून निषेध
X
मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण केलं होतं. त्या उपोषणानंतर मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा ज्वलंत झाला. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, यासाठी जरांगे-पाटील आग्रही आहेत. तर ओबीसी नेत्यांनी या मागणीला विरोध केलाय. यापार्श्वभूमीवर ओबीसी नेते तथा कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ, अँड. गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या विधानाला मराठा आरक्षणाच्या समर्थकांनी जोरदार विरोध करत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय.
दरम्यान, अंतरवाली सराटी इथं आज दुपारी १२ च्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी राज्यभरातून आलेल्या लोकांशी मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी संवाद साधला. यावेळी लोकांनी छगन भुजबळ आणि अँड. सदावर्ते यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केलाय. आरक्षण पदरात पाडून घेण्यासाठी संपूर्ण मराठा समाज एकवटलाय. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय शांत राहणार नाही, असं मत सभेसाठी आलेल्या लोकांनी व्यक्त केलंय.
अँड. सदावर्ते यांनी मनोज जरांगे-पाटील यांना अटक करण्याची मागणी केलीय. अंतरवाली सराटी इथली सभा हिंसक होईल, म्हणून सभा रद्द करण्याची मागणीही त्यांनी केलीय. त्यामुळं संतप्त झालेल्या लोकांनी सदावर्तेंना खडेबोल सुनावले. सदावर्तेंनी औकातीत राहावं, मराठा समाजाच्या बाबतीत बोलू नये. सदावर्ते हे कुणी सोडलेलं पिल्लू आहे, हे आम्हांला माहिती आहे. त्यामुळं त्यांनी औकातीत राहावं, असा इशाराही यावेळी उपस्थित लोकांनी दिलाय. तर छगन भुजबळांनी या सभेसाठी ७ कोटी रूपये कुठून आले, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावरही संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.