मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला अल्टिमेटम
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी खासदार संभाजी राजे यांनी उपोषण सुरू केले आहे. मात्र दिवसभरात सरकारचे कोणीही प्रतिनिधी उपोषणस्थळी आले नाहीत. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाने सरकारला अल्टीमेटम दिला आहे.
X
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी खासदार संभाजी राजे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. मात्र पहिला दिवस सरत आला असतानाही सरकार किंवा प्रशासनाचे प्रतिनिधी चर्चेसाठी न आल्याने मराठा क्रांती मोर्चाने सरकारला अल्टीमेटम दिला आहे.
राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द झाले. त्यानंतर राज्य सरकारने मराठा समाजाच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने खासदार संभाजी राजे यांनी सरकार विरोधात मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषण सुरू केले आहे. मात्र खासदार संभाजी राजे उपोषणाला बसून पहिला दिवस सरत असतानाही राज्य सरकारचे प्रतिनिधी किंवा प्रशासनाचे प्रतिनिधी चर्चेसाठी आले नाहीत. त्यामुळे उद्या संध्याकाळपर्यंत सरकारला वेळ देण्यात आला आहे. मात्र त्यानंतर सरकारने मागण्या मान्य न केल्यास मराठा क्रांती मोर्चा आक्रमक होईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने राज्य सरकारला दिला आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सरकारच्यावतीने कुणीही उपोषणस्थळी आले नाही. शासकीय डॉक्टरही आलेले नाहीत. त्यामुळे यांना उत्तरप्रदेशहून आलेले घोटाळेबाज मलिक मोठे वाटतात. परंतु संभाजी राजे मोठे वाटत नाहीत. त्यामुळे आम्ही राज्य सरकारचा राज्य सरकारचा निषेध करतो. तसेच आम्ही सरकारला सडेतोड उत्तर देऊ, असा इशारा गायकर यांनी दिला.
सरकारने आता स्वत:ची काळजी घ्यावी. कारण आम्ही सरकारच्या जीआरची होळी करणार आहोत. तसेच सर्व वाटा अडवून परतीचे रस्ते बंद करू, असा निर्वाणीचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विरेंद्र पवार यांनी दिला.
तसेच महाराष्ट्रात जे पडसाद उमटतील आणि उद्यापासून राज्यात जे घडेल, त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा धनंजय जाधव यांनी दिला. तसेच राज्य सरकारने घेतलेल्या भुमिकेचे वाईट परिणाम होतील, असे मत जाधव यांनी व्यक्त केले.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजीव भोर म्हणाले, महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने दखल न घेतल्यास पुढचा मार्ग वणवा पेटवणारा असेल. त्यामुळे सरकारने आत्ताच दखल घ्यावी कारण उद्या परिस्थिती वेगळी असेल असा इशारा यावेळी दिला.
राज्यात खासदार संभाजी राजे यांचे उपोषण सुरू असताना सरकारी डॉक्टरांपासून ते सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांच्याकडे पाठ फिरवल्याने मराठा समाज आक्रमक होणार असल्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने पत्रकार परिषदेत दिला. तर राज्यभरातून संभाजी राजेंच्या उपोषणाला पाठींबा मिळत आहे.