Home > News Update > मुंबईतही लसींचा तुटवडा, २५ ठिकाणी लस संपली...

मुंबईतही लसींचा तुटवडा, २५ ठिकाणी लस संपली...

मुंबईतही लसींचा तुटवडा, २५ ठिकाणी लस संपली...
X

राज्यात मोठ्याप्रमाणावर करोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यात मुंबईत आजपर्यंत 4,91,980 करोना बाधित रुग्ण आढळले असून 3,95,378 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 11,881 रुग्णांचा मृत्यू झाला असून 83,693 ॲक्टिव्ह रुग्ण आहे. करोना विषाणूच्या उद्रेकामुळे दिवसेंदिवस वाढत चाललेली रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कोविड -19 प्रतिबंधात्मक लसीकरण सुरु आहे. परंतु पुरेसा लससाठी नसल्याने २५ खासगी रुग्णालयात लसीकरण थांबले आहे. उर्वरित केंद्रांवर सध्या लसीकरण सुरु असून तेथेही उद्या पुरेल इतका लससाठा शिल्लक आहे. लससाठा उपलब्ध होण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.


बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोविड – १९ लसीकरण मोहिमेंतर्गत महानगरपालिका आणि शासन यांच्यातर्फे ४९ कोविड लसीकरण केंद्रे तसेच ७१ खासगी रुग्णालयात कोविड लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात या सर्व केंद्रांवर मिळून प्रतिदिन सरासरी ४० ते ५० हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येते.


लसींचा पुरवठा किती शिल्लक?


बृहन्मुंबई महानगरपालिकेला दिनांक ७ एप्रिल २०२१ पर्यंत एकूण १७ लाख ०९ हजार ५५० इतक्या लसी उपलब्ध झाल्या. पैकी, १५ लाख ६१ हजार ४२० लस उपयोगात आल्या. म्हणजेच १ लाख ४८ हजार १३० इतका लससाठा काल (दिनांक ७ एप्रिल २०२१) लसीकरणानंतर शिल्लक होता.


शिल्लक साठ्यातील ४४ हजार ८१० इतक्या लस दुसऱ्या मात्रेसाठी (सेकंड डोस) राज्य शासनाच्या निर्देशानुसार राखीव आहे. म्हणजेच एकूण १ लाख ०३ हजार ३२० इतक्या आज (दिनांक ८ एप्रिल २०२१) सकाळी उपलब्ध होत्या. आज (दिनांक ८ एप्रिल २०२१) चे सुमारे ४० ते ५० हजार लसीकरण पूर्ण झाल्यानंतर उद्या (दिनांक ९ एप्रिल २०२१) पुरेल इतका लससाठा उपलब्ध असेल.


Updated : 8 April 2021 11:02 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top