मंत्रालयात सांबर, चितळ, भेकर, साळींदरचा मुक्त संचार !
X
शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी लोकांची प्रचंड गर्दी असते. मात्र, या गर्दीत गुरुवारपासून सांबर, चितळ, भेकर, साळींदर असे हिंसक वन्यजीव प्राणी मुक्त संचार करताना दिसून येत आहेत. वन्यजीव सप्ताहनिमित्त शासनाने हे प्राणी मंत्रालय त्रिमूर्ती प्रांगणात आणले आहेत. विशेष म्हणजे भर गर्दीत या प्राण्यांकडून कोणालाही काहीही त्रास नसून त्यांच्या समवेत स्लेफी फोटो सुद्धा काढता येत आहे. कारण हे सर्व प्राणी जरी जिवंत भासत असले तरी त्याच्या या प्रतिकृती आहेत.
मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण हे सर्वानाच भुरळ घालत असते. येथील त्रिमूर्ती तसेच वेगवेगळ्या विभागाकडून भरवले जाणारे संबंधित विभागाचे स्टॉल हे मंत्रालयात येणाऱ्या सर्वानाच आकर्षित करीत असतात. सुधीर मुनगंटीवार हे वनमंत्री असताना त्यांनी याच त्रिमूर्ती प्रांगणात ताडोबा मधील वाघांची प्रतिकृती असलेले वाघ आणले होते. आजही त्यातील एक वाघ येथे आहे. तो नेहमीच येथे येणाऱ्या लोकांना भुरळ घालत असतो.
आता याच वाघासोबत गुरुवारपासून सांबर, चितळ, भेकर, साळींदर, उदमांजर, पिसोरी असे हिंसक वन्यजीव प्राणी मुक्त संचार करताना दिसून येत आहेत. भर गर्दीत एक भले मोठे सांबर आणि चितळ पाहुन अनेकांना आनंद होत आहे. त्यामुळे आपली रखडलेली कामे जरी पूर्ण झाली नाहीत किंवा मंत्र्यांची भेट जरी झाली नाही तरी या वन्यजीव प्राण्यांना पाहून त्याचा काहीसा संताप कमी होत आहे.
त्याच्या सोबत सेल्फी फोटो घेण्यात अनेक जण दिसून येत आहे. भर गर्दीत हे उठून दिसणारे प्राणी जरी हिंसक असले तरी ते त्या प्राणांची प्रतिकृती आहेत. त्यामुळे भर गर्दीत या वन प्राण्यांचा कोणाला काही त्रास नसल्याचे दिसून येत आहे.