#Pegasusspyware : ममता बॅनर्जी यांचा मोठा निर्णय
X
Pegasus spywar द्वारे हेरगिरी केली गेल्याचा गौप्यस्फोट काही माध्यमांनी केल्यानंतर देशाचे राजकारण तापले आहे. या स्पायवेअरद्वारे विरोधक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, सरकारी अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी यांच्यावर पाळत ठेवली गेली होती, असा दावा जगभरातील माध्यमांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी सरकारला घेरले आहे. या मुद्द्यावर सरकारने चौकशी करावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. पण सरकारने चौकशीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे संसदेमध्ये कामकाज व्यवस्थितपणे होऊ शकत नाहीये.
या सर्व पार्श्वभूमीवर प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा निर्णय घेतला आहे. Pegasus spywar पाळत प्रकरणी स्वतंत्र चौकशी आयोग नेमून चौकशी केली जाईल, असे ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले आहे. ममता बॅनर्जी यांनी दिल्लीला निघण्यापूर्वी ही घोषणा केली आहे. दिल्लीमध्ये त्या सोनिया गांधी यांच्यासह सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटणार आहेत. "संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकार या प्रकरणाच्या चौकशीची घोषणा करेल, तसेच सुप्रीम कोर्टाच्या नियंत्रणाखाली ही चौकशी केली जाईल, असे आम्हाला वाटले होते. पण सरकारने कोणताही निर्णय न घेतल्याने या प्रकरणात चौकशी सुरू करणारे प.बंगाल हे पहिले राज्य ठरले आहे." असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. Inquiry Act (1952) अंतर्गत या आयोगाची स्थापना केल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.