महाराष्ट्रात महाविकास आघाडी झाली त्याच प्रकारे केंद्रातही आघाडी: संजय राऊत
X
शरद पवार संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए) चे अध्यक्ष होणार या बातमीचा इन्कार खुद्द शरद पवारांनी केला असला तरी संजय राऊत यांनी ज्याप्रकारे महाराष्ट्रात महाविकास आघाडी झाली त्याच प्रकारे केंद्रात आघाडी होऊ शकते का? त्याचं नेतृत्व कोण करणार? या सगळ्या मोठ्या गोष्टी आहेत. त्यावरही निर्णय़ होतील असं मुंबईत पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पाठीमागे काँग्रेस खंबीरपणे उभी आहे. येत्या काही काळात शरद पवार यूपीएचे अध्यक्ष होतील, अशा बातम्या गुरुवारी दिवसभर माध्यमांमध्ये येत होत्या. "शरद पवार जर युपीएचे अध्यक्ष झाले तर आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. पण मला अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. शरद पवारांनीही हे वृत्त नाकारलं आहे.
शरद पवार महाराष्ट्राचे, देशाचे खूप मोठे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करत आहोत. पण जेव्हा युपीए अध्यक्षपदाबाबत आपण बोलत आहोत तेव्हा तसा कोणाताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही. ही गोष्ट जर शरद पवारांनी स्वत: सांगितली असेल तर त्यावर चर्चा करणं योग्य नाही," अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मजबूत आघाडी देणं गरजेचं आहे. या बाबतीत काँग्रेसला काही निर्णय घ्यावे लागतील.
"नव्या राजकीय वातावरणात विरोधकांना एकत्र येऊन काही निर्णय घ्यावे लागतील. काँग्रेस मोठा पक्ष आहे, पण लोकसभेत विरोधी पक्षाचं पद ते मिळवू शकले नाहीत हे सत्य आहे. अशा परिस्थितीत आपल्याला एकत्र येऊन युपीएला मजबूत करावं लागेल. ज्याप्रकारे महाराष्ट्रात महाविकास आघाडी झाली त्याच प्रकारे आघाडी होऊ शकते का? त्याचं नेतृत्व कोण करणार? या सगळ्या मोठ्या गोष्टी आहेत. त्यावरही निर्णय़ होतील," असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.