Beed: गेवराईत हाहाकार, तीन गावांचा संपर्क तुटला...
X
बीड जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गेवराई तालुक्यात भाटसांगवी ते राक्षसभूवन गावांना जोडणारा पूल वाहून गेला आहे. खळेगाव येथील नदी तुडुंब वाहतेय, नदीवरील पूल वाहून गेल्याने तीन गावांचा संपर्क तुटला, यामुळं जिल्ह्यातील अनेक लघू प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. तर नदी, नाले, ओढे हे दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील मनकर्णिका, मांजरा, कुंडलिका, सिंदफणासह अनेक लहान नद्यांना पूर आलाय. तर दुसरीकडे शेतातील उभ्या पिकांमध्ये पाणी शिरल्याने अतोनात नुकसान देखील झाले आहे. त्याचबरोबर वादळी वारा आल्यानं ऊस, मका, कापूस पिके लोळली गेली आहेत.
दरम्यान बीड जिल्ह्यात सर्वत्र मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने, जिल्ह्यातील प्रमुख नदी नाल्यांना पूर आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणी साठा उपलब्ध होणार आहे. मात्र काढणीला आलेल्या सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांना याचा फटका बसणार आहे.