Home > News Update > गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटकला मागे टाकत महाराष्ट्र ठरला अव्वल

गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटकला मागे टाकत महाराष्ट्र ठरला अव्वल

गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटकला मागे टाकत महाराष्ट्र ठरला अव्वल
X

गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटकला मागे टाकत महाराष्ट्र ठरला अव्वल महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. नुकत्याच झालेल्या पोषण पंधरवड्यात महाराष्ट्राने देशात पुन्हा एकदा पहिला क्रमांक पटकावला आहे. राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या कार्यक्रमांची संख्या (Activities) आणि सहभागी लाभार्थ्यांची संख्या (Participants) या दोन्हीही प्रकारात महाराष्ट्राने हे यश मिळविलेले आहे. विशेष म्हणजे कार्यक्रमांच्या संख्येत गुजरात आणि उत्तर प्रदेशला तर लाभार्थ्यांच्या संख्येतही कर्नाटक आणि गुजरातला महाराष्ट्राने मागे टाकले आहे. महिला बाल विकास विभागाच्यावतीने राबविण्यात आलेले विविध उपक्रम, अधिकारी आणि अंगणवाडी सेविकांनी घेतलेली मेहनत या सर्वांचा हा परिपाक असल्याची प्रतिक्रिया राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त दिली आहे.

आरोग्य आणि पोषण विषयांमध्ये जागृती करून आहार आणि आरोग्य विषयक सवयींमध्ये मूलगामी बदल करण्यासाठी पोषण अभियान सर्व स्तरावर राबवले जाते. कुपोषण निर्मुलनाची वार्षिक उद्दिष्टे निश्चित करून शासनाच्या विविध विभागांमधील अभिसरण पद्धतीने ही उद्दिष्टे साध्य करण्याबाबत कार्यवाही केली जाते. महिला आणि बालविकास विभाग पोषण अभियानात नोडल विभाग म्हणून कार्य करतो. तर नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग सार्वजनिक, आरोग्य विभाग हे पोषण अभियानाचा एक भाग आहेत. समाजामध्ये आहार आणि आरोग्य विषयासंदर्भात जनतेमध्ये जनजागृती व्हावी, स्वच्छतेचे भान निर्माण व्हावं आणि आरोग्याची चळवळ उभी व्हावी, यासाठी दरवर्षी विविध कार्यक्रम शासनाच्यावतीने आयोजन केले जातात.

दरवर्षी सप्टेंबर महिन्यात पोषण महिना म्हणून साजरा केला जातो. तर मार्च महिन्यात पोषण पंधरवडा साजरा केला जातो. या दोन्ही जनचळवळींमध्ये महाराष्ट्रानं सातत्याने पहिला क्रमांक मिळवला आहे. यावर्षी पोषण पंधरवड्यामध्ये पाण्याचे महत्त्व, ॲनिमियाबाबत जनजागृती आणि आहारामध्ये घरच्याघरी बनविलेल्या बनविलेल्या गरमागरम व ताज्या पदार्थांचं महत्त्व या संकल्पनावर आधारित विविध उपक्रम राबवण्यात आले होते. या उपक्रमांना लाभार्थ्यांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या उपक्रमांची संख्या आणि लाभार्थ्यांची संख्या ही देशात सर्वाधिक आहे. देशात पहिला क्रमांक मिळवताना महाराष्ट्राने सुमारे १ कोटी ४५ लाख ५८ हजार ६८० कार्यक्रम घेतले. तर गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. लाभार्थ्यांच्या संख्येतही महाराष्ट्र अग्रेसर असून ११३ कोटी ४६ लाख ३५ हजार ५५२ लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला. लाभार्थ्यांच्या संख्येबाबत कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात कार्यक्रमांच्या संख्येबाबत अनुक्रमे रायगड, सातारा आणि पुणे हे जिल्हे अग्रेसर आहेत. लाभार्थ्यांच्या सहभागाबाबत अनुक्रमे रायगड, परभणी आणि सातारा या जिल्ह्यांनी पहिला, दूसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे.

Updated : 5 April 2022 4:51 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top