प्रांताधिकाऱ्याकडून महिला तलाठ्याकडे शरीर सुखाची मागणी? ; महिला तलाठ्याचा व्हिडिओ समोर आल्याने एकच खळबळ
प्रांताधिकाऱ्याकडून महिला शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक आरोप येवल्यातील महिला तलाठ्याने केला आहे. संबंधित महिला तलाठ्याने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याकडे न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.
X
येवला : नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात कार्यरत असलेल्या महिला तलाठ्याकडे प्रांताधिकारी सोपान कासार यांनी शरीर सुखाची मागणी केली, आणि ती मागणी संबंधित महिला तलाठ्यांने फेटाळून लावल्याने संबंधित महिला तलाठ्याची तालुक्यातून बाहेर बदली केल्याचा आरोप महिला तलाठ्याने केली आहे.
याबाबत संबंधित महिला तलाठ्याने एक व्हिडिओ भाजप नेत्या चित्रा वाघ यांना पाठवत, न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.
या व्हिडिओमध्ये संबंधित महिला तलाठ्याने म्हंटले आहे की,प्रांताधिकारी सोपान कासार यांनी आपल्याकडे शरीर सुखाची मागणी केली ती आपण फेटाळून लावल्याने संबंधित प्रांताधिकारी कासार यांनी सूडबुद्धीने आपली तालुक्यातून बाहेर बदली केली. वास्तविक आपल्यापेक्षा वरिष्ठ असे 2 ते 3 तलाठी 11 ते 12 वर्षांपासून येवला तालुक्यात कार्यरत आहेत. त्यांची बदली न करता प्रांताधिकारी कासार यांनी आपली बदली केली आहे.
सोबतच बदलीच्या विरोधात आपण मॅटमध्ये गेलो असता, याचा बदला घेतल्याशिवाय आपण राहणार नाही अशी धमकी कासार यांनी दिल्याचा आरोप संबंधित महिला तलाठ्याने केला आहे. येवला तालुका हा नाशिक जिल्ह्यात येत असून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा हा मतदार संघ असल्याचे महिला तलाठ्याने म्हटलं आहे,याबाबत त्यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याकडे न्याय मिळवून देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हा व्हिडीओ ट्विट करत ' मायबाप सरकार काय चाललंय आपल्या राज्यात' असं म्हंटले आहे. वरिष्ठ अधिकारी महिला कर्मचाऱ्यांकडे शरीर सुखाची मागणी करतो ती पूर्ण न केल्याने संबंधित महिला कर्मचाऱ्याला काय काय सहन करावं लागतं ऐका असं म्हणत वाघ यांनी संबंधित महिला तलाठ्याचा व्हिडिओ ट्विट केला आहे.