Home > News Update > पाणी टंचाईचे भीषण वास्तव, पाणी भरण्यासाठी गेलेल्या चिमुकलीचा मृत्यू

पाणी टंचाईचे भीषण वास्तव, पाणी भरण्यासाठी गेलेल्या चिमुकलीचा मृत्यू

राज्यात महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्याच्या अनेकदा चर्चा होतात. मात्र आता दोन किलोमीटर अंतरावरून पाणी आणण्यासाठी गेलेल्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

पाणी टंचाईचे भीषण वास्तव, पाणी भरण्यासाठी गेलेल्या चिमुकलीचा मृत्यू
X

केंद्र सरकारने जल जीवन मिशन सुरू करून महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्याचा संकल्प केला. मात्र तरीही महिला आणि मुलींना डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी जावं लागत असल्याचं चित्र आहे. त्यातच रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पळसदरी येथे पाणी भरण्यासाठी गेलेल्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने पाणीटंचाईचे भीषण वास्तव समोर आले आहे.

हर घर जल असा नारा देत केंद्र सरकारने जल जीवन मिशनची सुरुवात केली. या योजनेच्या माध्यमातून महिलेच्या डोक्यावरील हंडा उतरवण्याचा संकल्प करण्यात आला होता. मात्र रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पळसदरी ठाकूर वाडी येथील 13 वर्षीय मुलीचा पाणी आणण्यासाठी गेल्यानंतर मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कर्जत तालुक्यातील पळसदरीच्या ठाकूरवाडीतील 13 वर्षीय सारिका रामदार पिरकर ही खोपोली-शहापूर राष्ट्रीय महामार्गाच्या पलिकडे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या रेल्वेच्या धरणातील पाणी आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी रस्ता ओलांडताना भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने तिला जोरदार धडक दिली. यानंतर सारिकाला पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी या उपचारादरम्यान सारिकाचा मृत्यू झाला. त्यामुळे सारिका पिरकर या मुलीच्या मृत्यूची नोंद ही अपघाती अशी झाली असली तरी सारिका पाणीटंचाईची बळी ठरली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या डोक्यावरचा हंडा कधी उतरवला जाणार याची चर्चा रंगली आहे.


Updated : 8 Jun 2023 2:08 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top