राज्यात मिनीविधानसभेचा पुन्हा धुरळाः जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्तपदांसाठी 5 जूनला मतदान
X
राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि न्यायालयीन कचाट्यात सापडलेली मिनिविधानसभेच्या निवडणुकांची प्रक्रीया पुन्हा सुरु झाली आहे, रिक्त जागांसाठी मतदान येत्या ५ जूनला होणार असल्याचं राज्य निवडणुक आयोगानं जाहीर रेले आहे.
पालघर, धुळे, नंदुरबार, वाशीम, नागपूर आणि अकोला जिल्हा परिषदेतील 2 निवडणूक विभागांच्या आणि पंचायत समितीतील 6 निर्वाचक गणांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 जून 2022 रोजी मतदान; तर 6 जून 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने आज केली.
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या चितवी (ता. नवापूर) आणि अकोला जिल्हा परिषदेच्या हातरुण (ता. बाळापूर) या निवडणूक विभागासाठी ही पोटनिवडणूक होत आहे. पोशेरा (मोखडा, जि. पालघर), हिसाळे (शिरपूर, जि. धुळे), हट्टी खु. (साक्री, जि. धुळे), असली (अक्राणी, जि. नंदुरबार), ब्राम्हणवाडा न- मारसुळ (मालेगाव, जि. वाशीम) आणि चणकापूर (सावनेर, जि. नागपूर) या पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील मतदान होईल. संबंधित निवडणूक विभाग आणि निर्वाचक गणांत आजपासून आचारसंहिता लागू झाली असून निकाल जाहीर होईपर्यंत ती लागू राहील. नामनिर्देशनपत्र 17 ते 23 मे 2022 या कालावधीत दाखल करता येतील. 22 मे 2022 रोजी रविवारच्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 24 मे 2022 रोजी होईल. 5 जून 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 6 जून 2022 रोजी सकाळी दहा वाजता सुरू होईल.