कोल्हापूरमध्ये दोन गटात राडा, आक्षेपार्ह स्टेटसमुळे तणावाचं वातावरण
X
6 जून रोजी महाराष्ट्रात शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जात असताना कोल्हापूरमध्ये दोन गटात राडा झाल्याचे समोर आले.
संपूर्ण महाराष्ट्रात शिवप्रेमींकडून शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जात आहे. पण या सोहळ्यानंतर अहमदनगर पाठोपाठ आता कोल्हापूरात औरंगजेबच्या फोटोवरुन राडा सुरू आहे. राष्ट्रपूरूषांचा अवमान करणाऱ्या सोशल मीडियावरील आक्षेपार्ह स्टेटसमुळे कोल्हापूरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. कोल्हापूरात आक्षेपार्ह स्टेट्स ठेवल्याने दंगल उसळली आहे. यानंतर तोडफोड देखील झाली. आज हिंदुत्ववादी संघटनांकडून कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली. त्यामुळे कोल्हापूरात मोठ्याप्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांची हिदुत्ववादी संघटने सोबत बैठक झाली. यावेळी पंडित यांनी कोल्हापूर बंदची हाक मागे घ्यावी, असं हिंदुत्ववादी संघटनेला सांगितले होते. परंतू हिंदुत्ववादी संघटना निर्णयावर ठाम आहे. या प्रकरणी आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं आहे.
मागील महिन्यात काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी ‘पन्हाळा, जयसिंगपूर येथील घटना, तसेच सोशल मीडियावरून फिरणारे संदेश पाहिल्यानंतर येत्या दोन-तीन महिन्यांत कोल्हापुरात काही तरी घडवले जाण्याची शंका व्यक्त केली होती. त्यानंतर काल शिवराज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यानं वादाची ठिणगी पडली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी संशयाची सुई अप्रत्यक्षपणे सतेज पाटलांकडे वळवली आहे.
वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये औंरगजेब आणि टिपू सुलतानचे उदात्तीकरण होणं हा काही योगायोग नाही. विरोधी पक्षाच्या लोकांनी वारंवार म्हणणं की, दंगली घडवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर विशिष्ट समाजाकडून औरंगजेबाचं उदात्तीकरण होणं हा योगयोग नाही. याच्या खोलवर जाणं गरजेचं आहे. औरंगजेबाचं उदात्तीकरण करत आहेत. आम्ही हे खपवून घेणार नाही. हे चालणार नाही. हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
औरंगजेब कुणाला जवळचा वाटतो, हे सर्वांना माहिती आहे. सगळे एकाचवेळी एकाच सुराच बोलतात आणि त्याला प्रतिसाददेखील मिळतो, हे कसं काय? असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला.