महाराष्ट्र आणि कर्नाटकात कोरोना अलर्ट: परीस्थिती भीषण; पंतप्रधान चिंतेत
X
महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ या राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या आजही वाढत आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाच्या संकटात काही दिवसांपासून काही फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. त्यात नागरिक मास्क वापरत नाहीत. कोरोनाच्या कुठल्याही नियमांचे पालन करत नाहीत. हे दृश्य चांगले नाही. यामुळे चिंता वाढते आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली होती. त्यात त्यांनी 'सबका साथ, सबका विकास' हा मंत्र पुन्हा सर्व मंत्र्यांना दिला. त्यांना कामावर लक्ष केंद्रित करण्यास आणि नवी ओळख बनवण्यास सांगितले. आपल्या मंत्रालयाची कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कोरोनाची परिस्थिती सध्या नियंत्रणात असली तरी महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळसह देशातील ८ राज्यांमध्ये परिस्थिती आजही गंभीर आहे. तेथील कोरोना रुग्णवाढ चिंताजनक आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे. लसीकरण वेगाने सुरू आहे. अशावेळी दुर्लक्ष करू नये. एका चुकीचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील. कोविडविरुद्ध सुरू असलेला लढा यामुळे कमकुवत होईल. अनेक नागरिकांनी मनमोकळेपणे फिरण्यास सुरुवात केली आहे. परंतु कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही, हे त्यांनी लक्षात ठेवून आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे. कोरोनाच्या नियमांचे पालन करून योग्य ती खबरदारी घेण्याचे आणि न घाबरण्याचे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी जनतेला केले आहे.
मागील २४ तासात राज्यात ८ हजार ५३५ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ६ हजार १३ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, १५६ करोनाबाधित रूग्णांचा आज राज्यात मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. यामुळे राज्यात करोनाचा धोका अद्यापही कायमच असल्याचे दिसून येत असून, सर्वांनीच करोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. राज्यातील एकूण बाधितांची संख्या ६१,५७, ७९९ झाली आहे.
दरम्यान, राज्यात आजपर्यंत ५९,१२,४७९ रूग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.०२ टक्के आहे. याचबरोबर, राज्यात करोनामुळे १,२५,८७८ रूग्ण दगावले असून, राज्याचा मृत्यू दर २.०४ टक्के आहे. राज्यातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या १,१६,१६५ आहे