#FarmerProtets – सेलिब्रिटींवर ट्विटसाठी मोदी सरकारने दबाव टाकला? राज्य सरकारचे चौकशीचे आदेश
X
दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत परदेशातील काही सेलिब्रिटींनी पाठिंब्याचे ट्विट केल्यानंतर सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांच्यासह काही सेलिब्रिटींनी सरकारच्या समर्थनार्थ ट्विट केले होते. पण आता या ट्विटसाठी मोदी सरकारने सेलिब्रिटींवर दबाव टाकला होता का, याची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पॉप स्टार रेहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांनी ट्विट केल्यानंतर भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये बाहेरच्यांनी हस्तक्षेप करु नये असे ट्विट काही सेलिब्रिटींनी केले होते.
पण हे ट्विट करताना काही सेलिब्रिटींच्या ट्विटमध्ये साधर्म्य असल्याचे दिसते. त्यामुळे या लोकांवर मोदी सरकारचा दबाव होता का, याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केली आहे. तसेच देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या या लोकांना सुरक्षा देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्याचा गुप्तहेर विभाग याची चौकशी करेल असे जाहीर केले आहे.