दुकाने, मॉलसाठी राज्य सरकारचे नवीन नियम, किती वाजेपर्यंत राहणार सुरु?
X
राज्यातील दुकाने, मॉल, उपाहारगृहे रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्री मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील कोरोना रोखण्यासाठीचे निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामध्ये दुकाने, मॉल, उपाहारगृहे रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहेत.
दुकानात काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर १४ दिवसाचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक राहिल.
शॉपिंग मॉल्स :
राज्यातील सर्व शॉपिंग मॉल्स सर्व दिवस रात्री १०.०० वा. पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. तथापि, शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक राहिल व तसे लसीकरण प्रमाणपत्र व त्यासमवेत फोटोसहीत ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहील.
जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून, स्पा :
वातानुकुलित तसेच विनावातानुकुलित जिम्नॅशिअम,योगसेंटर, सलून स्पा ५० टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री १०.०० वा. पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. तथापि, उक्त संस्था वातानुकूलीत असल्यास, वायुविजनासाठी फॅन व वातानुकूलनासह खिडकी अथवा दरवाजा उघडा ठेवणे आवश्यक राहील.
इनडोअर स्पोर्टस:
इनडोअर स्पोर्ट्स असलेल्या ठिकाणी खेळाडूंचे व तेथील कर्मचारी व व्यवस्थापन यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर १४ दिवस झालेले असणे आवश्यक राहील. तसेच, या ठिकाणी हवा खेळती राहण्यासाठी योग्य वायुविजन व्यवस्था असणे आवश्यक राहील. या ठिकाणी खेळाडूना बॅडमिंटन, टेबलटेनिस, स्क्वॅश,पॅरलल बार, मलखांब अशाच खेळांसाठी केवळ दोन खेळाडू या मर्यादेत सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे.