गणेशोत्सवात राज्य शासनाचा शेतकऱ्यांना दिलासा, मदतनिधी थेट खात्यात जमा होणार
X
यंदा राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे , विविध रोगांमुळे शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला गेला होता. शेतकरी कर्जबाजारी झाला होता. या सगळ्याचे पडसाद पावसाळी अधिवेशनात देखील उमटले होते. विरोधकांनी सरकारला पाचही दिवस या एकाच विषयावर विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करून घेरले होते. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी साडे तीन हजार कोटी रूपयांची भरघोस मदत जाहिर केली आहे.
राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या मदतीचा शासन निर्णय जारी केला आहे. राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे एकूण २३ लाख ८१ हजार ९२० हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. यामध्ये राज्यातील २५ लाख ९३ हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. या बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी ३ हजार ५०१ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
आपत्तीग्रस्त शेतक-यांना मदत निधी तातडीने वितरीत करण्याचे आदेश मदत व पुनर्वसन विभागाकडून संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधितांच्या मदतीत वाढ करण्याचा निर्णय सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्यानुसार जिरायत शेतीसाठी पूर्वीचा दर प्रति हेक्टरी ६८०० वरून वाढवून प्रति हेक्टरी १३ हजार ६०० रुपये, बागायत शेतीसाठी प्रति हेक्टरी १३ हजार ५०० रूपयांवरन २७ हजार रुपये आणि बहुवार्षिक शेतीसाठी पूर्वीचा दर १८ हजार रूपयांवरून ३६ हजार रुपये करण्यात आला आहे.
शेतक-यांसाठीचा मदतीचा निधी संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिका-यांकडे सूपुर्द करण्यात आला आहे. ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ऑनलाइन पद्धतीने जमा करण्याचे आदेशही शासनातर्फे देण्यात आले आहेत. याबाबतचा शासन निर्णय महसूल व वन विभागाने ८ सप्टेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.
अतिवृष्टी,पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ३,५०१ कोटींंची मदत वितरित करणार. राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या नुकसानीची राज्य आपत्ती प्रतिसाद निधीपेक्षा वाढीव दराने दिली जाणार मदत. जिरायत शेतीला १३,६००रु, बागायत शेतीला २७ हजार तर बहुवार्षिक शेतीला ३६ हजार रुपये मिळणार pic.twitter.com/jdNzKm2pLs
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 9, 2022
दरम्यान, राज्यात पुन्हा सुरु झालेल्या पावसामुळं शेतकरी आणखी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.