Home > News Update > काँग्रेसचा अतंर्गत वाद मिटणार?

काँग्रेसचा अतंर्गत वाद मिटणार?

नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. त्यानंतर काँग्रेसमधील धूसफूस पाहायला मिळाली. मात्र आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक पाऊल मागे घेत हा वाद मिटवण्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेसचा अतंर्गत वाद मिटणार?
X

नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली होती. त्यातच निवडणुकीतील अपक्ष उमेदवार विजयी झाल्यावर या वादाला अधिक रंग चढला. अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी या निवडणुकीत विजय संपादन केला. त्यानंतर त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले. आणि राज्यातील काँग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यातच विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या गटनेतेपदाचा राजीनामा दिला.

त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद अधिक स्पष्टपणे सर्वासमोर आला. बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या गटनेते पदाच्या राजीनाम्याबाबत नाना पटोले यांनी आता मोठे वक्तव्य केले आहे. थोरात यांनी राजीनामा दिला ना तशा आशयाचे पत्र दिले आहे, असे पटोले यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर हा वाद एकत्रितरित्या बसून सोडवू असे म्हणत बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे यांच्याशी समेट करण्याची तयारी नाना पटोले यांनी दाखवली आहे.

नाना पटोले यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा खुलासा केला आहे. चर्चेमधून हा वाद सोडवू अशी भूमिका पटोले यांनी घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसमधील या गोंधळावर लवकरच मार्ग निघणार का? अशी चर्चा राज्याच्या राजकारणात आणि काँग्रेसमध्ये सुरू झाली आहे.

बाळासाहेब थोरात यांनी राजिनामा दिलेल्या पत्राची कॉपी मला दाखवा, अशी मागणी नाना पटोले यांवी काही दिवसांपूर्वी मिडीयासमोर केली होती. थोरातांनी राजिनामा दिल्याचे असे कुठलेही पत्र किंवा राजीनामापत्र मला किंवा काँग्रेस पक्षश्रेष्ठींना दिलेले नाही. असे नाना पटोले यांनी मिडीला सांगितले होते. मला त्या दोन्ही पैकी कोणतीही कॉपी दाखवावी, अशी मागणी पटोले यांनी केली होती. कोणत्याही वृत्तपत्राने किंवा चॅनेलने ते पत्र दाखवलेले नाही, असं नाना पटोले यांनी म्हटले आहे.

या सर्वांवरुन हे दिसून येत आहे की, बाळासाहेब थोरातांनी कोणतेही पत्र दिलेले नाही आणि राजीनामाही दिलेला नाही. त्यामुळे त्यांचे पत्र आणि राजीनामा हे बोलण्यापूरतेच आहे, असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. आता या वादावर पडदा पडला असून, फक्त माध्यमामध्ये हा वाद वाढवला जात आहे. आमची चर्चा सुरू असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे. मात्र यावर बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रीया मिळू शकलेली नाही. त्यामुळे हा वाद नक्की संपला की तात्पुरता संपवण्यात आला, हे कळायला कोणताही मार्ग नाही. जोपर्यंत थोरातांची यावर प्रतिक्रीया येत नाही.


Updated : 15 Feb 2023 8:56 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top