मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूण दौऱ्यावर, चिपळूणकरांसाठी मुख्यमंत्री काय मदत जाहीर करणार?
X
रत्नागिरी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूण दौऱ्यावर आहेत. राज्यभरात मागील चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे चिपळूणमध्ये दाणादाण उडाली आहे. दरम्यान मुख्यमंत्री ठाकरे चिपळूण बाजारपेठेची पाहणी करून व्यावसायिक यांच्याशी चर्चा करणार आहेत. चिपळूणच्या बाजारपेठ परिसरात पुराच्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे चिपळूण येथील हॉटेल अभिषेक येथे बैठक घेणार आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांसह प्रमुख अधिकारी उपस्थित आहेत
शनिवारीच मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाडचा दौरा करत तेथील दरडग्रस्त तळीये गावाला भेट दिली होती. आता ते चिपळूणला दौऱ्यावर आहेत. चिपळूणकरांसाठी ते काय मदत जाहीर करणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह जिल्हाधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकारी असणार आहेत.
महापूरग्रस्त चिपळूणची सद्यस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड तालुक्यात अतिवृष्टीने अनेक नद्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी पाणी भरले. चिपळूण बाजारपेठ पुराच्या वेढ्यात सापडली तर खेड मधील पोसरे येथेही मोठी दुघटना घडली. अतिवृष्टीने संगमेश्वर, रत्नागिरी तालुक्यातील नद्यांना पूर आल्याने किनाऱ्यावरील गावांमध्ये काही बाजारपेठा, गावांमध्येही पुराचे पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. राजापूर मध्येही अर्जुना नदीला पूर आल्याने राजापूर बाजारपेठेतही पाणी भरले होते. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये ही अतिवृष्टीने नुकसान झाले असून या सर्व स्थितीचा मंत्री नारायणराव राणे अधिकाऱ्यांकडून आढावा घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पूरपरिस्थितीमुळे नागरिकांचे आतोनात नुकसान झालं असून प्रचंड हाल होत आहेत. प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना सुरू असून मदतकार्य युध्दपातळीवर सुरू आहे. ज्या ठिकाणी पुराचं पाणी ओसरल आहे त्याठिकाणी नागरिकांकडून साफसफाई केली जात आहे.पुराचं पाणी काही प्रमाणात जरी ओसरत असलं तरी मात्र, अनेकांनी आपल्या आप्तस्वकीयांना गमावले असल्याने चिपळूणकरांच्या डोळ्यातील पाणी काही ओसरत नाहीये.