महाडच्या तळ्याच्या पाण्याची चव आता चाखता येणार
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने आणि क्रांतिकार्याने पावन झालेल्या सामाजिक समतेचे प्रतिक असलेले महाडचे चवदार तळे आणि क्रांतिभूमी परिसराच्या विकासासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. लवकरच या कामांना प्रारंभ करण्यात येईल अशी माहिती महाडच्या नगराध्यक्ष स्नेहल जगताप आणि आरपीआयचे जिल्हाध्यक्ष तथा पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी दिली.
X
माजी आमदार माणिक जगताप यांच्या प्रयत्नांतून चवदार तळ्यातील पाण्याच्या शुद्धीकरणासाठी १ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या कामांना तातडीने प्रारंभ करण्याच्या सूचना समाजकल्याण विभागाला दिल्या आहेत.
समाज कल्याण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चवदार तळे, क्रांतिभूमी परिसराला भेट देऊन पाहणी केली. स्नेहल जगताप, जगदीश गायकवाड, संदीप जाधव यांच्यासह नगरपालिकेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जलशुद्धीकरण प्रकल्पाचा शुभारंभ येत्या १९,२० मार्च रोजी करण्याचा मनोदय यावेळेस जगदीश गायकवाड यांनी बोलून दाखविला. छत्रपती शाहू महाराज सभागृहासाठी ८५ लाख रुपये मंजूर झाले असून हे सभागृह पाडून नवे सभागृह या ठिकाणी बांधण्यात येणार आहे. चवदार तळे येथे पॅगोडा बांधण्याच्या सूचना नामदार रामदास आठवले यांनी दिल्या आहेत, अशी माहिती श्री गायकवाड यांनी दिली.
नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी नगरपालिकेच्या सततच्या पाठपुराव्याला यश मिळाले असल्याचे सांगितले. क्रांतिस्तंभ सुशोभीकरणासाठी नगरपालिकेच्या ताब्यात दिल्यास नगरपालिका स्वखर्चाने हे काम करेल असे त्या म्हणाल्या. चवदार तळे ते क्रांती स्तंभ मार्गाचे सुशोभीकरण करण्याचा मानसही त्यांनी यावेळेस बोलून दाखविला.
चवदार तळे जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित झाल्या नंतर त्यातील पाणी पिण्यायोग्य होणार आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी, देशवासीय चवदार तळ्याला भेट देत असते आणि तीर्थ म्हणून पात्रातील पाणी प्राशन करीत असते.