हे तर एक नंबर लबाड सरकार!: चंद्रकातदादा पाटील
X
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा ताळमेळ दिसत नाही. सरकारमधील प्रत्येक घटक वेगळी भूमिका मांडतो. हे एक नंबर लबाड सरकार आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
"तुम्ही परीक्षेची तारीख जाहीर करणार म्हटलात पण विद्यार्थ्यांनी तुमच्यावर का विश्वास ठेवायचा?," असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. हे सरकार विद्यार्थ्यांपासून शेतकरी वर्गापर्यंत कोणतेही प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहे अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये बेबंदशाही चालू आहे. त्याचंच उदाहरण म्हणजे प्रत्येक मंत्री सतत वेगवेगळी भूमिका मांडताना दिसतोय. यातून या सरकारमधील मंत्र्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा ताळमेळ दिसून येत नाही. सरकारमधील प्रत्येक घटक वेगळी भूमिका मांडतो, असे त्यांनी सांगितले.
गुरुवारी झालेल्या विद्यार्थी आंदोलनात राजकीय नेते मंडळी होते. याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला गेला असा आरोप सत्ताधारी पक्षाकडून केला जात आहे असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "जिथे जिथे अन्याय होणार तिथे भाजपाचा कार्यकर्ता जाणार. छत्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही चालणार आहोत".
"वाढत्या कोरोना संसर्गावर राज्यातील जिल्हा प्रशासनाने निर्णय घ्यावेत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. मात्र मला एकच वाटतं की स्वतः मुख्यमंत्र्यांनी नो लॉकडाउन अशी भूमिका जाहीर करावी," असं चंद्रकांत पाटील यांनी सांगत "धोरणच असं ठरवावं लागेल की लॉकडाऊन होणार नाही. जिथे जिथे गर्दी असेल तिथे नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. तसंच प्रशासनाने त्याबाबत सक्ती केली पाहिजे," असंही ते म्हणाले.
"आता हे बंद करा ते बंद करा हे सांगण्यापेक्षा सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. मास्क नसेल तर दंड केला पाहिजे. गर्दीच्या कार्यक्रमावर निर्बंध आणले पाहीजेत. व्यापार बंद करा, परीक्षा घेऊ नका हे परवडेल असं मला वाटत नाही. शेवटी सरकार ज्यांचं असतं त्यांनी सर्वांचं ऐकून निर्णय करायचा असतो. त्यांनी तो घेण्याची गरज आहे. तसंच देशातील इतर राज्यांनी नियम आणि काळजी घेऊन ज्याप्रकारे परीक्षा घेतल्या त्यानुसार राज्य सरकारनें सर्व नियम पाळून परीक्षा घेतल्या पाहिजेत," अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी शेवटी सांगितलं.