'माफ्सु'च्या कुलगुरुपदी डॉ नितीन पाटील
X
केंद्रीय कृषी संशोधन परिषदेच्या जोधपूर येथील केंद्रीय शुष्क क्षेत्र संशोधन संस्था येथे मुख्य शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉ नितीन वसंतराव पाटील यांची नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी डॉ नितीन पाटील यांची कुलगुरुपदी नियुक्ती केली आहे.
डॉ पाटील यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी किंवा ते वयाची ६५ वर्षे पूर्ण करतील, यापैकी जे अगोदर असेल तोपर्यंत, करण्यात आली आहे.
डॉ नितीन पाटील (जन्म २८ सप्टेंबर १९६१) यांनी अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातून पशुवैदयकीय विज्ञान या विषयात पदव्युत्तर पदवी तसेच राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था कर्नाल येथून पीएच.डी. प्राप्त केली आहे. त्यांना अध्यापन, संशोधन व विस्तार कार्याचा व्यापक अनुभव आहे.
'माफ्सु'चे कुलगुरु डॉ अशिष पातुरकर यांचा कार्यकाळ दिनांक २१ जानेवारी २०२३ रोजी सपंल्याने विद्यापीठाचे कुलगुरुपद रिक्त झाले होते. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ शरद गडाख यांचेकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.
कुलगुरु नियुक्तीसाठी राज्यपालांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती आर.के. अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. केंद्रीय मत्स्यविज्ञान शिक्षण संस्थेचे संचालक डॉ रविशंकर सी एन. व पदुम विभागाचे प्रधान सचिव जे पी गुप्ता हे कुलगुरु निवड समितीचे सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ नितीन पाटील यांची निवड केली.