लंपी आजार माणसांना होत नाही, फक्त गाय आणि बैलापुरताच मर्यादित – पशुसंवर्धन विभाग आयुक्त
X
राज्यात सगळीकडे गाय आणि बैलांमध्ये लंपी आजाराची लागण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोलापूर, जलगाव, अहमदनगर या सारख्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांना या रोगाची लागण झाली आहे. नुकताच आलेला कोव्हिड १९ हा आजार देखील प्राण्यांमधूनच माणसात पसरला होता त्यामुळे नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या सर्व पार्श्वभुमीवर राज्याचे पशु संवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबईत आणि त्याच विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत हा आजाराची लागण माणसाला होत नाही असे सांगत निर्धास्त राहण्यास सांगितले.
पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र सिंह यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परीषदेत महत्वपुर्ण माहिती दिली. लंपी रोगाने आज मंगळवार १३ सप्टेंबरपर्यंत राज्यात २६६४ जनावरे संक्रमित झाली आहेत. राज्यातील ३३८ गावांमध्ये हे रुग्ण आढळले आहेत. आत्तापर्यंत ५ लाखापेक्षा अधिक जनावरांचे लसीकरण झाले आहे. शिवाय १६ लाखाहून अधिक लसी आपल्याकडे उपलब्ध आहेत अतिरिक्त ५ लाख लसी प्राप्त होणार आहेत याशिवाय पुढील आठवड्यात ५० लाख लसी उपलब्ध होतील.
महाराष्ट्रात मार्च २०२० मध्ये देखील या रोगाचे काही रुग्ण आढळले होते . त्यावेळी २ लाखांहून अधिक रुग्ण होते यातील फक्त १८ जनावरांना जीव गमवावा लागला. प्राण्याची भूक कमी होणे, ताप येणे आणि अंगावर सूज येणे ही या आजाराची लक्षणे आहेत. जर आपल्या प्राण्याला असे काही लक्षण दिसत असतील तर लवकरात लवकर पशूसंवर्धन विभागाशी संपर्क साधा तसेच आयुक्तालयातील विभागाच्या डॉक्टरांशी संपर्क साधा असं आवाहन आयुक्तांनी शेतकऱ्यांना केलं आहे. सकाळी ८ ते ६ टोल फ्री नंबर देखील दिला आहे त्यावर संपर्क करू शकता
लंपी रोग हा माणसांमध्ये पसरत नाही. तसेच प्राण्यांपासून मिळणाऱ्या दुधातून हा आजार संक्रमित होत नाही. म्हशीला हा रोग होत नाही त्यामुळे त्यांना लसीकरण करण्याची गरज नाही असेही त्यांनी सांगितले. लंपी आजार फक्त गाय आणि बैल यांना होतो. पूर्ण महाराष्ट्रात बैल बाजार पुढील आदेशापर्यंत बंद राहील. शासनाने दिलेले सगळे आदेश पाळा अशी माहिती त्यांनी दिली आहे.