‘ताईंनी सांगितलं तर एमआयएमही मान्य आहे’ पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांचा सोशल मीडियावर सूर
X
पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या फेसबुक पोस्टनंतर राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. राजकीय वर्तूळात सध्या पंकजा मुंडे काय निर्णय जाहीर करणार यावरच चर्चा सुरु आहेत. आज सकाळी पंकजा यांनी त्यांच्या ट्विटरच्या बायोवरून भाजपनं (BJP) नाव हटवल्याच्या बातम्या आल्या आणि त्यानंतर पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.
पंकजा यांच्या फेसबुक पोस्टनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचं वातावरण आहे. मात्र, असं असलं तरी पंकजाताई जो निर्णय घेतील त्याच्यासोबत असल्याचं त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. ताईंनी अगदी एमआयएममध्ये जाण्याचा निर्णय घेतला तरीही तो मान्य असेल असा सूर त्यांच्या कार्यकर्त्यांचा आहे.
हे ही वाचा...
- … आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या ‘प्रियांका चोप्रा जिंदाबाद’च्या घोषणा
- उद्धव ठाकरेंचा मुक्काम ‘मातोश्री’वरून ‘वर्षा’वर; देवेंद्र फडणवीसांना मिळाला ‘सागर
- Big News : पंकजा मुंडेंच्या शिवसेना प्रवेशावर संजय राऊत यांचे मोठे विधान
पंकजा यांनी स्वतःची कार्यकर्त्यांची फळी तयार केली आहे. सोशल मीडियावरही त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर अँक्टीव्ह असतात. भगवानगडाचा वाद झाला होता त्यावेळी या कार्यकर्त्यांनी पंकजांच्या बाजूने वातावरण तयार केलं होतं. आताही हे सर्व कार्यकर्ते पंकजांच्या बाजूनेच असल्यातं सांगत आहेत.
पंकजा मुंडे यांना मानणारा एक मोठा वर्ग राज्यात आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भ, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पंकजा मुंडे यांची चांगली लोकप्रियता आहे. त्या स्वतः जरी यावेळी निवडून आलेल्या नसल्या तरी भाजपमध्ये मुंडे गटाचे अनेक आमदार आणि पदाधिकारी आहेत. त्यामुळे पंकजा यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतलाच तर भाजपला राज्यात मोठं भगदाड पडू शकतं.