खाद्यसंस्कृती धर्माशी जोडणे चुकीचे: शाहू पाटोळे
'दलित किचन ऑफ महाराष्ट्र' पुस्तकावर विचारवेध संमेलनात चर्चा
X
विचारवेध असोसिएशन आयोजित सहाव्या विचारवेध संमेलनात रविवारी, दुपारच्या सत्रात 'दलित किचन ऑफ महाराष्ट्र' या पुस्तकाच्या संदर्भात लेखक शाहू पाटोळे यांची अनुवादक भूषण कोरगावकर यांनी मुलाखत घेतली. राष्ट्रसेवा दल सभागृहात झालेल्या या मुलाखतीतून खाद्य संस्कृती, भाषा, आहारावरुन घातले जाणारे वाद यावर उहापोह झाला.
शाहू पाटोळे म्हणाले,पूर्वापारपासून सर्वजण ' अन्न हे पूर्ण ब्रह्म' ऐकत आल्यामुळे ' अन्न हे अपूर्ण ब्रह्म' हा शब्दप्रयोगच लक्षात घेतला जात नाही.हे पुस्तक वाचणाऱ्या परदेशातील वाचकांना हिंदू हे बीफ खातात, बफ खातात यावर विश्वास बसत नाही. यात लपविण्यासारखे काय आहे ? अमूक अन्न खाल्याने तमुक धर्माचा अपमान होतो,हे खोटे आहे.सगळे हिंदू शाकाहारी नाहीत. मांसाहार चांगला आहे,याचा प्रचार करावा लागत नाही.शाकाहार चांगला आहे,हे सांगावे लागते,हे लक्षात घेतले पाहिजे. खाद्यसंस्कृती असते,तशी भाषा संस्कृतीदेखील असते.प्रमाण मराठी भाषेपेक्षा आमची मराठी अधिक समृद्ध आहे,हेही मी सांगू शकतो. विदेशी वाचकसुद्धा मला कळवतात, की माझ्या पुस्तकातील हे अन्न त्यांचे पूर्वज खात होते.
आहारावरून केल्या जाणाऱ्या वादाबद्दल बोलताना पाटोळे म्हणाले,'गोवंश हत्येवर बंदी आहे.पुढे यमाचे वाहन म्हणून रेड्याच्या हत्येवर बंदीची मागणी झाली, मत्स्यावतार, वराह अवतार म्हणून त्या त्या गोष्टींवर बंदी आली, तरी आश्चर्य वाटणार नाही,असा हा काळ आहे'.
ते पुढे म्हणाले,'आहारात बदल होत राहणार,ती अपरिहार्य प्रक्रिया आहे.पण, सक्तीने हे बदल होऊ नयेत.संस्कृती सुटी-सुटी नसते. खाद्य हे आपल्याकडे धर्माशी जोडले गेले आहे. प्रत्यक्षात खाद्यवैविद्य अनेक इतर घटकांशी जोडलेले आहे. जात, वर्ण व्यवस्था जितक्या जास्त, तितक्या खाद्य संस्कृती अधिक,हे लक्षात घेतले पाहिजे. भाषेत जातीय, वर्णीय भेद आहेत,तसे खाद्यातही भेद आहेत. हे भेद उतरंडीनुसार वरून खाली आले आहेत. कोणी काय खावे,हे सरकारने ठरवू नये. मांसाहारासारखे विशिष्ट आहार वाईट आहे, अशी अंधश्रद्धा पसरवली जात आहे. महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी आहे, बफ वर बंदी नाही. म्हशीच्या, डुकराच्या मांसावर बंदी नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.तरीही संभ्रम निर्माण केला जात आहे.
कमी पाणी,स्प्रिंकलर, कीटकनाशक आल्याने रानभाज्याही जवळपास संपुष्टात आल्या आहेत,असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.
भूषण कोरगावकर म्हणाले,'भाषा ही एका वर्गाच्या हातात गेल्याने अनेक गोष्टी लपून राहिल्या.दलित, आदिवासी, ख्रिश्चन, भटके असे सगळ्यांचे शब्द, पाककृती साहित्यात आले पाहिजे.'अन्न हे अपूर्ण ब्रह्म 'चे इंग्रजी भाषांतर करताना काम सोपे नव्हते.'अन्न हे अपूर्ण ब्रह्म 'पुस्तकामध्ये ब्लॅक ह्युमर आहे. टीका, द्वेष नाही.
गीताली वि.मं., अनिकेत साळवे, मुकुंद किर्दत,शारदा वाडेकर आदी उपस्थित होते.