मुलींच्या शिक्षणासाठी समाजाचे सकारात्मक योगदान महत्वाचे - लीला पुनावाला
X
वर्धा - शिक्षणाच्या माध्यमातूनच मूली यशाचे शिखर गाठू शकतात. यासाठी तांत्रिक शिक्षण महत्त्वाचे असून, मूलीचे शिक्षण आणि त्यासाठी समाजाचे सकारात्मक योगदान समाजात नवे परिवर्तन घडवू शकते.असे मत पद्मश्री लीला पुनावाला फाऊंडेशनच्या अध्यक्षा लीला पुनावाला यांनी व्यक्त केले.
लीला पुनावाला फाउंडेशनतर्फे वर्ध्याच्या दत्ता मेघे सभागृह येथे गरजू व गुणवंत विद्यार्थीनीना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून मॅक्स महाराष्ट्रचे डिजिटल न्यूज चॅनलचे कार्यकारी संपादक मनोज भोयर, फाऊंडेशनच्या अध्यक्षा पद्मश्री लिला पुनावाला, संस्थापक फिरोज पूनावाला, आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रीती खरे , तनवीर मिर्धा डॉ. वैशाली ताकसांडे, योगिता मानकर, स्मिता बढिये, डॉ रूहिना खान प्रामुख्याने उपस्थित होते.
ग्रामीण आणि शहरी भागातल्या अत्यंत गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा लीला पूनावाला फाऊंडेशनचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.मुली शिक्षित होवून स्वतःच्या पायावर उभ्या झाल्या तर संपूर्ण कुटुंबाचा त्या आधार ठरतात इतकच नव्हे तर त्या पुढच्या पिढीला शिक्षणाची गोडी लावतात. असं मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे मनोज भोयर यांनी व्यक्त केले. ग्रामीण भागात असहाय ,गरीब, आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींची पैशाअभावी खूप दैना होते.आणि त्यातही इंजीनियरिंग आणि नर्सिंगसारखा महागडा अभ्यासक्रम पूर्ण करायचा असेल तर तो त्यांना अजिबात पूर्ण करता येत नाही.त्यामुळे अशा मुलींना एलपीएफकडून होणारी मदत अत्यंत मोलाची आहे आणि त्यामुळे त्यांचे सामाजिक योगदान सुद्धा खूप मोठे आहे.असंही आपल्या भाषणात भोयर यांनी सांगितलं.