Home > News Update > परमबीर सिंह यांच्यावर लेटरबॉम्ब सुरुच... आता उमेश पाटील यांच्या नावाने पत्र व्हायरल

परमबीर सिंह यांच्यावर लेटरबॉम्ब सुरुच... आता उमेश पाटील यांच्या नावाने पत्र व्हायरल

राज्यातील राजकीय सत्ता अस्थिर करणाऱ्या माजी पोलिस आयुक्त परमबीर यांच्या गृहमंत्र्यावरील १०० कोटीच्या वसुलीनंतर लेटर बॉम्बनंतर परमबीर सिंह यांच्यावर पोलिस दलातील अधिकाऱ्यांनी पत्र लिहून आयुष्य उध्दस्थ केल्याचा आरोप केल्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उघड केलेल्या बदली घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे सोलापूरचे जिल्हा परीषद सदस्य उमेश पाटील यांच्या नावानं मुख्य सचिवांना तक्रार पत्र व्हायरल झालं आहे.

परमबीर सिंह यांच्यावर लेटरबॉम्ब सुरुच... आता उमेश पाटील यांच्या नावाने पत्र व्हायरल
X

प्रति,

मा.श्री. सीताराम कुंटे साहेब,

मुख्य सचिव,महाराष्ट्र राज्य,मंत्रालय, मुंबई _32

अर्जदार : उमेश सुरेश पाटील,नरखेड,ता.मोहोळ,जि.सोलापूर -413 213

कार्यकारी जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सोलापूर, जिल्हा परिषद सदस्य सोलापूर,जिल्हा नियोजन मंडळ सदस्य, सोलापूर.मो.9881740950 ई-मेल : [email protected]

विषय : राज्य गुप्तवार्ता विभागाच्या माजी आयुक्त सौ.रश्मी शुक्ला यांच्या दिनांक 20/08/2020 व 25/08/2020 रोजीच्या गोपनीय पत्रा मध्ये माझ्या नावाचा बेकायदेशीररित्या उल्लेख करून व तो गोपनीय अहवाल समाज माध्यमांवर प्रसारित करून माझी बदनामी करणे तथा माझ्या परवानगीशिवाय माझ्या मोबाईलचे सी डी आर तपासणे यासंदर्भात सौ रश्मी शुक्ला यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करणे बाबत...

संदर्भ पत्र जावक क्रमांक: SID/HQ/SPL Cell/09/2020 Dr.25/08/2020

राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्तपदी असताना सौ.रश्मी शुक्ला यांनी 20/ 8/ 2020 व 25/ 8 /2020 या दिवशी राज्याचे पोलिस महासंचालक यांना गोपनीय अहवाल पाठविला होता. त्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या संदर्भामध्ये मध्यस्थी किंवा दलाली करणारे रॅकेट आणि त्यासंदर्भातील मोबाईल फोनचे सीडीआर तपासण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यामध्ये काही लोकांचे सी डी आर संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. या सर्व नमूद अहवालामध्ये माझ्या नावाचा उल्लेख असल्याने व सदर अहवाल समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाल्याने, मी ही तक्रार करत आहे.

सदर अहवालामध्ये दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा उल्लेख माझ्या नावाच्या समोर करण्यात आलेला आहे.त्यापैकी एक श्री.मनोज पाटील (सध्या पोलीस अधीक्षक अहमदनगर) व दुसरे श्री. सुहास बावचे (सध्या उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई) हे आहेत.

मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या,सोलापूर जिल्हा कार्यकारी जिल्हाध्यक्ष या पदावर मागील दीड वर्षापासून कार्यरत असून, सोलापूर जिल्हा परिषदेचा व जिल्हा नियोजन मंडळाचा सदस्य देखील आहे. तसेच मी 2012 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, राज्यस्तरीय प्रवक्ता म्हणून पूर्णवेळ कार्यरत आहे.

श्री मनोज पाटील हे सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते.जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षका सोबत कार्यकर्त्यांच्या व नागरिकांच्या वेगवेगळ्या कामाच्या, समस्या सोडविण्याच्या निमित्ताने लोकप्रतिनिधी म्हणून व पक्ष संघटनेचा पदाधिकारी म्हणून संवाद संपर्क होणे हे अत्यंत नैसर्गिक आहे.

लोकप्रतिनिधी असल्याने व संघटनेचा प्रमुख पदाधिकारी असल्याने माझा जिल्हा प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकारी यांच्यासोबत वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने प्रत्यक्ष व मोबाईल द्वारे संवाद संपर्क होत असतो. याच पद्धतीने तात्कालिक पोलीस अधीक्षक असलेले श्री. मनोज पाटील यांच्यासोबत अनेक वेळा संवाद संपर्क झालेला आहे. परंतु, त्यांच्यासोबत, त्यांच्या बदली किंवा पोस्टिंगच्या संदर्भात कधीही कुठलीही चर्चा झालेली नाही.सौ. रश्मी शुक्ला यांनी दिलेल्या गोपनीय अहवालामध्ये श्री मनोज पाटील सोलापूर येथून पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक पदाकरिता इच्छुक असल्याचे नमूद केले आहे. वास्तविक श्री मनोज पाटील यांची बदली अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक या पदावर झाली आहे.याचा अर्थ स्पष्ट होतो की, श्री मनोज पाटील यांना त्यांच्या तथाकथित इच्छेप्रमाणे बदली पोस्टिंग मिळू शकलेली नाही. तरी श्री मनोज पाटील यांच्या बदलीच्या संदर्भाने माझ्या नावाचा उल्लेख जाणीवपूर्वक खोडसाळपणाने, मला व माझ्या पक्षाला बदनाम करण्याकरिता करण्यात आला आहे.त्यामुळे माझे श्री मनोज पाटील यांच्या सोबत झालेले मोबाईल संभाषण उघड करण्याचे जाहीर आवाहन मी, महाराष्ट्र शासनाला करत आहे.

तसेच, सदर अहवालात उल्लेख करण्यात आलेले दुसरे पोलिस अधिकारी श्री सुहास बावचे हे माझे कॉलेज जीवनापासूनचे वर्गमित्र आहेत. श्री सुहास बावचे व मी, "डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी" येथे एकत्रित बी.एस.स्सी. एग्रीकल्चर चे शिक्षण घेतले असून,दोघेही एकाच वसतिगृहामध्ये राहण्यास होतो. वास्तविक कॉलेजमधील सहकाऱ्या सोबत,वर्ग मित्रासोबत केवळ तो पोलिस अधिकारी आहे म्हणून,संवाद संपर्क असणे यामध्ये काही आक्षेप असण्याचे कारण नाही. तरीही श्री.सुहास बावचे यांच्या बदली पोस्टिंगच्या संदर्भात माझे नाव जोडण्यात आले आहे. हे मला व माझ्या पक्षाला बदनाम करण्याचे जाणीवपूर्वक रचलेले षड्यंत्र तथा कटकारस्थान आहे.

श्री सुहास बावचे हे पुणे शहर येथे उपायुक्त पदावर कार्यरत होते. तेथून त्यांची राज्य गुप्त वार्ता विभाग येथे म्हणजे प्रशासनाच्या भाषेत त्यांना साइड पोस्टिंग मिळाली होती. माझ्या वर्ग मित्रालाही,मी तथाकथित चांगल्या मोक्याच्या जागेवर पोस्टिंग मिळवून देण्याकरता कसलाही प्रयत्न केला नसल्याचे,त्यांच्या झालेल्या साईड पोस्टिंग वरून लक्षात यायला हवे.

तसेच सदर अहवालामध्ये माझा माननीय गृहमंत्री यांचे खाजगी सचिव श्री.संजीव पलांडे यांच्यासोबत संपर्क असल्याचे म्हटले आहे. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकारी जिल्हाध्यक्ष व पक्षाचा प्रवक्ता तसेच लोकप्रतिनिधी या नात्याने माननीय गृहमंत्री यांच्याकडे सातत्याने नागरिकांच्या विविध प्रश्नांच्या करिता वारंवार संपर्क होत असतो.त्या संपर्काचा, संवादाचा संदर्भ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या बाबतीत जोडणे हे अत्यंत चुकीचे व खोडसाळपणाचे आहे. यासंदर्भात जर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या अनुषंगाने कोणतीही चर्चा वरीलपैकी कोणाही अधिकारी किंवा मंत्र्या सोबत झाल्याचे रेकॉर्डिंग किंवा इतर कुठलाही पुरावा असेल तर,मी योग्य त्या कायदेशीर कारवाईस सामोरे जाण्यास तयार आहे.

तथापि सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या तसेच महत्वाच्या राजकीय पक्षाचा राज्य प्रवक्ता म्हणून,पक्षाचा चेहरा असलेल्या,जबाबदारीच्या पदावर कार्यरत असणाऱ्या पदाधिकाऱ्याचा दलाल किंवा एजंट असा उल्लेख करून सौ रश्मी शुक्ला मॅडम यांनी माझा व माझ्या पक्ष नेतृत्वाचा अपमान केला आहे.तसेच गोपनीय माहिती

जग जाहीर करून जनतेचीही दिशाभूल केली आहे.

तसेच,महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याच्या षड्यंत्रामध्ये राजकीय कार्यकर्त्या प्रमाणे सहभागी होऊन, तात्कालिक राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त सौ.रश्मी शुक्ला यांनी,अधिकाराचा दुरुपयोग करत गोपनीय कागदपत्रे जाहीर करून अक्षम्य अपराध केला आहे .त्यामुळे त्या स्वतःच विरोधी पक्ष नेत्यांच्या अधिकृत एजंट म्हणून काम करत असल्याचे प्रमाणित झाले आहे.

सदर अहवालात माझ्यावर आरोप करण्यापूर्वी, सौ रश्मी शुक्ला यांनी माझ्याशी संपर्क करून माझी बाजू ऐकून घेणे आवश्यक होते. सदर तथाकथित बदल्यांच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा कुठलाही सबळ पुरावा नसताना,केवळ दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या बरोबर मोबाईल दारे संपर्क केला म्हणून तथाकथित बदल्यांच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप करून सौ.रश्मी शुक्ला मॅडम यांनी माझी व माझ्या पक्षाची बदनामी केली आहे. तसेच माझ्याविरुद्ध कोणाचीही कायदेशीर तक्रार नसताना, यासंदर्भातील कुठलीही पार्श्वभूमी नसताना, एखाद्या राजकीय पक्षाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांच्या मोबाईलचे सी डी आर तपासणे हे नियमबाह्य व बेकायदेशीर असून माझ्या खाजगीपणावर (Right to Privacy) व माझ्या व्यक्तिस्वातंत्र्यावर (Personal Liberty) अतिक्रमण करणारे आहे. त्यामुळे सौ रश्मी शुक्ला मॅडम यांनी कोणाच्या परवानगीने अथवा सांगण्यावरून माझ्या मोबाईलचे सी डी आर तपासले? याची योग्य त्या नियमानुसार चौकशी होणे आवश्यक आहे.

सदर अहवाल हा "अत्यंत गोपनीय" (TOP SECRETE) असल्याचे नमूद केलेले असून सुद्धा सर्व सोशल मीडियावर सदर अहवाल कसा काय जाहीर करण्यात आला? यासंदर्भात, तात्कालिक राज्य गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख सौ रश्मी शुक्ला व त्यांना या कामी मदत करणारे इतर अधिकारी व खाजगी व्यक्ती यांची रितसर चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी माझी नम्र विनंती आहे.

या प्रकारामुळे मला व माझ्या कुटुंबाला प्रचंड मनस्ताप झाला असून माझी व माझ्या कुटुंबाची मानहाणी झाली आहे व सदर प्रकारामुळे माझे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.त्यामुळे मी,सौ रश्मी शुक्ला मॅडम यांच्याविरुद्ध रु.100 कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करत आहे.

तरी माननीय महोदय, आपण माझ्या तक्रारीच्या अनुषंगाने,सौ रश्मी शुकला यांची कायदेशीर चौकशीची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी व त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करून मला न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती.तसेच सदर गोपनीय अहवालाची प्रत सर्व प्रकारच्या समाज माध्यमांवर, मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर प्रसारित करण्यास मनाई करणारा आदेश संबंधितांना करण्यात यावा ही विनंती.

धन्यवाद,

आपला विश्वासू

उमेश पाटील

Updated : 25 March 2021 9:58 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top