Home > News Update > हा सुर्य आणि हा जयद्रथ करूयात, उदयनराजेंचे शिवेंद्रसिंहराजेंना आव्हान

हा सुर्य आणि हा जयद्रथ करूयात, उदयनराजेंचे शिवेंद्रसिंहराजेंना आव्हान

सातारा नगरपंचायत निवडणकीची जोरदार तयारी सुरू आहे. त्यापार्श्वभुमीवर दोन्ही राजघराण्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. तर हा सुर्य आणि हा जयद्रथ करण्यास तयार असल्याचे सांगत भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर फेसबुक पोस्टच्या माध्यमातून निशाणा साधला.

हा सुर्य आणि हा जयद्रथ करूयात, उदयनराजेंचे शिवेंद्रसिंहराजेंना आव्हान
X

सातारा शहरात उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील शीतयुध्द पुन्हा पेटले आहे. तर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरू झाल्या आहेत. त्यातच शिवेंद्रसिंहराजे यांनी उदयनराजे यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, सातारा नगरपालिका निवडणूक जवळ आली की त्यांना इनोव्हेटीव्ह साताऱ्याचे स्वप्न पडते. याबरोबरच सातारा नगरपालिका ही भ्रष्टाचाराचे कुरण झाली आहे. त्यामुळे साताऱ्यात नुसतं चरायचे आणि खिसे भरायचे काम सुरू आहे, अशी टीका शिवेंद्रसिंहराजे यांनी केली होती. त्या टीकेला उदयनराजे यांनी उत्तर दिले आहे.

शिवेंद्रसिंहराजे यांना उदयनराजे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून प्रत्युतर दिले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, सातारा शहराच्या विकासासाठी आणि उज्वल भविष्यासाठी सुरू केलेली इनोव्हेटीव्ह सातारा योजना समाजाचे हीत साध्य करणारी योजना आहे. पण ज्यांना या शब्दाचे स्पेलिंगही अचूक सांगता येणार नाही, त्यांनी या उपक्रमाविषयी बोलू नये. तसेच लोकांच्या गतीमान आयुष्यासाठी राबवलेल्या योजनांना ते भ्रष्टाचार म्हणत असतील तर होय आम्ही भ्रष्टाचार केला आहे.

त्याबरोबर उदयनराजे म्हणाले की, ज्यांना आरोप करायचे असतील त्यांनी पुराव्यासहीत आरोप करावेत आणि सिध्द करून दाखवावेत, असे आव्हान दिले. तर खऱ्याला मरण नसून हा सुर्य आणि हा जयद्रथ करायला आम्ही तयार असल्याचे उदयनराजे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून शिवेंद्रसिंह राजे यांना आव्हान दिले.

काय आहे उदयनराजे यांची फेसबुक पोस्ट-

"सातारा शहराच्या व शहरवासीयांच्या उज्वल भविष्यासाठी आम्ही सुरु केलेली इनोव्हेटीव्ह सातारा ही योजना, समाजाची आणि समाजहित साध्य करुन घेण्याची चिरकाल चालणारी योजना आहे. ज्या लोकांना इनोव्हेटीव्ह सातारा या शब्दाचा अर्थ आणि शब्दाचे स्पेलिंग अचुक सांगता येणार नाही त्यांनी आमच्या इनोव्हेटीव्ह सातारा या उपक्रमाविषयी काही बोलु नये.

जनमानसात आमची एक वेगळी छबी आहे. आम्ही सामान्य जनतेकरीताच आजपर्यंत जीवन व्यतीत केले आहे. काहींना आमची धडाडी आणि लोकप्रियता खुपत असते म्हणूनच कथित भ्रष्टाचाराचे मोघम आणि बिनबुडाचे आरोप करणे हा त्यांचा स्थायी भाव बनला आहे. लोकांच्या गतीमान सोयी , सुविधांसाठी कोणत्या योजना राबविणे, लोकहिताची अंमलबजावणी करणे ही जर भ्रष्टाचाराची व्याख्या असेल तर होय.. आम्ही भ्रष्टाचार केला आहे.

स्वार्थ्याध भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. सहकाराचा गळा घोटुन स्वाहाकार करुन आता रियल इस्टेटमध्ये घुसलेल्या व्यक्तींनी आजपर्यंत फक्त स्वार्थ पाहीलेला आहे. स्वार्थ नसेल तर त्यांचा कोणताही उपक्रम होत नाही, अश्या व्यक्तींना निस्वार्थीपणे नागरीकांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींची वाढती लोकप्रियता सहन होणारी नाही म्हणून त्यांची नेहमीच कुरकूर असते.

उदयनराजें हे नेहमीच समाजासाठी जगणारी व्यक्ती म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचित आहे. कुणी कितीही उलट्या बोंबा मारत असले तरी त्या बोंबा मारणा-यांना समाजाने पुरते ओळखले आहे. शाश्वत विकासाच्या गप्पा

ठोकणा-यांनी, चालवता आल्या नाहीत म्हणून दोन सहकारी बॅन्कांचे विलिनीकरण केले. तरीही उजळ माथ्याने हिंडणा-यांचा सहकारातील अचंबित करणारा शाश्वत विकास सभासद, नागरीकांनी पाहीला आहे. त्यांचे पोटात एक आणि ओठात एक या वैशिष्ठयाचा अनेकांना बसलेला झटका लोक विसरलेले नाहीत. म्हणून बेछुट, बेताल आरोप करुन, त्यांचा सुरु असलेला चारित्र हननाचा प्रयत्न यशस्वी होणार नाही.आम्ही त्यांच्या वक्तव्याला फारशी किंमतही देत नाही.

संबधीतांना तरीही आरोप करायचे असतील तर ते त्यांनी पुराव्यानिशी आणि चार-चौघात चर्चेला सामोरे जावून, सिध्द करुन दाखवावेत असे आमचे आव्हान आहे. खऱ्याला मरण नाही हा सूर्य आणि हा जयद्रथ करायला आम्ही तयार आहे."

आता उदयनराजे यांनी केलेल्या टीकेला शिवेंद्रसिंह राजे काय उत्तर देणार? उदयनराजेंचे आव्हान शिवेंद्रसिंह राजे स्वीकारणार का? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Updated : 16 Feb 2022 4:44 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top