उन्हाची तीव्रता वाढल्याने लिंबूच्या दरात वाढ...
X
थंडीचा महिना सुरु असताना अचानकपणे काही दिवस राज्यातील नागरिकांना उन्हाचा झळा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे नागरिकांचा कल लिंबू पाणी पिण्याकडे वाढलेला दिसून येतो. मात्र आता या लिंबूच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. एका लिंबू पाण्याच्या ग्लासाची किंमत ही दुप्पट झाली आहे. एक ग्लास लिंबू पाणी दहा रुपयांना मिळत होते त्याचा रेट थेट २० रुपये झाला आहे.
जानेवारी महिना संपला आणि फेब्रुवारी महिना सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यापासूनच चोपडा तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढू लागला आहे. दिवसा उन्हाचे चटके आणि पहाटे थंडीची हुडहुडी अशा वातावरणाचा अनुभव नागरिक घेत आहेत. दुपारच्या उन्हाच्या पारापासून बचाव करण्यापासून नागरिक लिंबूच्या सरबताला जास्त पसंती देत आहेत. त्यामुळे लिंबूच्या दरात मोठ्याप्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. उन्हाळ्यात नागरिकांकडून लिंबूची मागणी मोठ्या प्रमाणावर होत असते. परंतु सध्या फेब्रुवारी महिन्यातच लिंबूची मागणी वाढली आहे.
उन्हाचा पारा हळूहळू चढू लागला आहे. आतापासूनच लिंबूचे दर गगनाला भिडलेले पाहायला मिळत आहेत. बाजारात १०० रुपये किलो दारने लिंबूची विक्री होत आहे. लिलावमध्ये ७० ते ८० रुपये किलोने लिंबूची विक्री होत असल्याने किरकोळ विक्रेते हे शंभर रुपये पासून पुढे विक्री करत आहे. यावर्षी लिंबूची आवक कमी असल्याने आतापासून लिंबूचा भाव वाढलेला दिसून येत आहे. येणाऱ्या काळामध्ये लिंबूची आवक कमी झाल्यास आणखी मोठ्या प्रमाणावर लिंबूचे भाव वाढतील, असे व्यापारी वर्ग सांगत आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर उन्हाळ्यात लिंबू पाणी पिणे सुद्धा नागरिकांना माहाग होवून बसेल, यात शंका नाही.