'फ्लाईंग सिख' मिल्खा सिंग यांचे निधन
X
भारताचे विक्रमवीर धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन झाले आहे. फ्लाईंग सिख अशी त्यांची ओळख होती. ते ९१ वर्षांचे होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मोहाली इथल्या एका हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नीचेही कोरोनामुळे निधन झाले होते. उपचारांनंतर त्यांची कोरोना चाचणी
निगेटिव्ह आला होती. पण त्यानंतर त्यांना ताप येऊन ऑक्सिजन पातळी कमी झाली. त्यातच त्यांचे निधन झाले. कोरोनामधून बरे झाल्यावर त्यांना घरी सोडण्यात आले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात मिल्खा सिंग यांचा जन्म १९२९ मध्ये झाला. पाकिस्तानातील पंजाब मध्ये त्यांचा जन्म झाला होता. पण फाळणीमुळे त्यांना आपले सर्वस्व गमवावे लागले.
१९५८ मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्यांनी २०० व ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवत इतिहास घडवला. यानंतर त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकत देशाचे नाव उज्ज्वल केले. त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिल्खा सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. मिल्खा सिंग यांच्या निधनाने आपण एका महान खेळाडूला गमावले आहे. देशवासीयांच्या मनात त्यांचे स्थान कायम राहील, या शब्दात मोदींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.